भारतात कोणाला मिळालय ‘फील्ड मार्शल’ पद? काय आहे इतिहास?
पाकिस्तानच्या लष्कराने भारताकडून युद्धात मोठा पराभव पत्करल्यानंतरही विजयाचा देखावा करत आपल्या लष्करप्रमुखाला सर्वोच्च पदाने गौरवले आहे. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले आणि त्यात पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले.

तरीदेखील पाकिस्तानच्या सरकारने जनरल आसिम मुनीर यांना 'फील्ड मार्शल' या पाच-सितारा पदावर पदोन्नत करून आश्चर्याचा धक्का दिला आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची हवालदिल स्थिती
८-९ मेच्या रात्री पाकिस्तानने भारतावर ४०० हून अधिक ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांनी हे सर्व ड्रोन हवेतच निष्क्रिय केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या आठहून अधिक एअरफोर्स बेस, रडार केंद्रे आणि संरक्षण यंत्रणांवर लक्ष्य साधत निर्णायक प्रत्युत्तर दिले. या कारवाईमुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली.
फील्ड मार्शल पद म्हणजे काय?
फील्ड मार्शल हा लष्करातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. ही पदवी सामान्यतः युद्धातील अपवादात्मक नेतृत्वासाठी दिली जाते आणि ती जनरल रँकपेक्षा वरची असते. यामध्ये पाच-सितारे असतात आणि हा दर्जा प्राप्त अधिकारी आजीवन लष्करी मानधन आणि सन्मानास पात्र असतो.
मुनीर यांना मिळालेल्या पदाचा अर्थ काय?
फील्ड मार्शलपद हे केवळ एक सन्मान नसून, त्यामागे अनेक राजकीय संकेत दडलेले असतात. पाकिस्तानमध्ये जनरल मोहम्मद अयूब खान यांना १९५९ मध्ये ही पदवी देण्यात आली होती आणि त्यांनी नंतर सैन्य तख्तापलट करून राष्ट्रपतीपदही घेतले होते. आता दुसऱ्यांदा ही पदवी दिली गेली आहे ती जनरल आसिम मुनीर यांना.
ते २०२२ पासून लष्करप्रमुख आहेत आणि २०२७ पर्यंत त्यांच्या कार्यकाळात वाढ करण्यात आली आहे. यावरून त्यांची लष्करातील ताकद आणि राजकीय वजन किती आहे, हे स्पष्ट होते. सध्या त्यांना सुमारे २.५ लाख पाकिस्तानी रुपये (सुमारे ₹७५,००० भारतीय रुपये) मासिक वेतन मिळते.
शहबाज सरकारचा मुनीर यांना पाठिंबा?
पाकिस्तानातील जनतेत असंतोष असतानाही शहबाज शरीफ सरकारने जनरल मुनीर यांना सन्मानित करून स्पष्ट संकेत दिले आहेत की सरकार लष्कराच्या मागे आहे. असेही मानले जाते की, मुनीर यांच्या आशीर्वादामुळेच शहबाज सरकार सत्तेत आले आणि आता सरकार त्यांच्या 'ऋणाची परतफेड' करत आहे. यामुळेच काहीजण याला संभाव्य सैन्यशासन थांबवण्यासाठीचा 'राजकीय सौदा' मानत आहेत.
भारतामध्ये कोणाला मिळाला हा दर्जा?
भारतीय सैन्यात 'फील्ड मार्शल' ही मानद पदवी आहे. आजपर्यंत फक्त दोन अधिकाऱ्यांना हा गौरव मिळाला आहे.
सैम मानेकशॉ: १९७१ च्या भारत-पाक युद्धात ऐतिहासिक विजय मिळवून त्यांनी बांगलादेशाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना १९७३ मध्ये फील्ड मार्शल घोषित करण्यात आले.
के.एम. करियप्पा: स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले लष्करप्रमुख. १९४७-४८ च्या युद्धातील नेतृत्वासाठी त्यांना १९८६ मध्ये हा सन्मान मिळाला.
फील्ड मार्शलना आयुष्यभर वेतन, निवास, वैद्यकीय सुविधा आणि शासकीय सन्मान मिळतो
भारताकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तानने आपल्या लष्करप्रमुखाला 'फील्ड मार्शल' बनवणे हे राजकीय दबाव आणि लष्कराच्या वाढत्या वर्चस्वाचे द्योतक मानले जात आहे. जनतेचा विरोध, पराभवाची लज्जास्पद स्थिती आणि तरीही पदोन्नती - यामुळे पाकिस्तानची लोकशाही आणखी एका लष्करी छायेत अडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications