राष्ट्रपतीच्या सहीनंतर वक्फ विधेयकाचे कायद्यात रुपांतर; तो कसा व कधी लागू होईल? वाचा संपूर्ण प्रकरण
वक्फ दुरुस्ती विधेयक प्रथम लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी संध्याकाळी उशिरा वक्फ (सुधारणा) विधेयकाला मान्यता दिली. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक आता कायद्यात रूपांतरित झाले आहे. सरकारने नवीन वक्फ कायद्याबाबत राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. आता हा कायदा कधी लागू होईल, तो कसा लागू होईल, हे प्रश्न समोर येत आहे. दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लाँ बोर्डाने याबाबत एक पत्र प्रसिद्ध केले आहे.

कधी होईल कायदा लागू?
दोन्ही सभागृहात मंजूर केल्यानंतर आता राष्ट्रपतीने या दुरुस्तीला मंजूरी दिली आहे. आता वक्फ कायदा कधी लागू होईल हे सरकारवर अवलंबून आहे. कारण केंद्र सरकार कायद्याच्या अंमलबजावणीच्या तारखेबाबत स्वतंत्र अधिसूचना जारी करेल आणि हा कायदा संपूर्ण देशात लागू केला जाईल.
मुस्लिम पर्सनल लॉने लिहिले पत्र
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (AIMPLB) वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ दोन पानांचे पत्र शनिवारी संध्याकाळी प्रसिद्ध केले. त्यात देशव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जोपर्यंत या सुधारणा पूर्णपणे रद्द होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचे या पत्रात सांगितले आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक हे इस्लामिक मूल्ये, धर्म आणि शरिया, धार्मिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य, सांप्रदायिक सलोखा आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेवर गंभीर हल्ला असल्याचे त्यात म्हटले आहे.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी वक्फ विधेयकाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात शनिवारी याचिका दाखल केली. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या. पहिली बिहारमधील किशनगंज येथील काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी आणि दुसरी एआयएमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली होती.












Click it and Unblock the Notifications