'अशा छोट्या मोठ्या घटना घडतात', महाकुंभातील चेंगराचेंगरी बद्दल मंत्र्यांचे असंवेदनशील विधान
Maha Kumbh Stampede 2025: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मंगळवारी मध्यरात्री चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 10 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण जखमी झाले. संगम नाक्यावर ही दुर्घटना घडली आहे. जिथे हजारो भाविक पवित्र स्नानासाठी जमले होते. आता या अपघाताबाबत उत्तर प्रदेश सरकारच्या एका मंत्र्याचे असंवेदनशील विधान समोर आलं आहे.
आज तकच्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय निषाद म्हणाले, 'भाविकांनी जिथे जागा असेल तिथे स्नान करावे. ज्याठिकाणी इतकी मोठी गर्दी असते, इतके मोठे व्यवस्थापन असते, तिथे अशा छोट्या मोठ्या घटना घडतात.' मात्र, त्यांच्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

फोटो सौजन्य- पीटीआय
मंत्री संजय निषाद यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधकांनी टीका केल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. मंत्री निषाद म्हणाले की जीभ घसरली आणि हे विधान बाहेर आले. या घटनेमुळे सर्वांनाच दुःख झालं आहे. ही घटना छोटी मानली जात नाहीये...ही एक मोठी घटना आहे. दरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या घटनेबाबत महाकुंभाच्या गैरव्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची सोशल पोस्ट
समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव यांनी आपल्या सोशल मिडिया एक्सवर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, 'महाकुंभातील गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या अपघातात भाविकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. श्रद्धांजली! ', अशी पोस्ट अखिलेश यादव यांनी केली आहे. तसेच सरकारकडे त्यांनी काही मागन्या ही केल्या आहेत.
आम्ही आमच्या सरकारला आवाहन करतो की:
- गंभीर जखमींना एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने जवळच्या सर्वोत्तम रुग्णालयात नेले पाहिजे आणि त्वरित वैद्यकीय उपचार दिले पाहिजेत.
- मृतांचे मृतदेह ओळखून ते त्यांच्या नातेवाईकांना सोपवून त्यांच्या निवासस्थानी पाठवण्याची व्यवस्था करावी.
- विभक्त झालेल्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी त्वरित प्रयत्न केले पाहिजेत.
- हेलिकॉप्टरचा चांगला वापर करून पाळत वाढवावी.
- सतयुगापासून सुरू असलेल्या 'शाही स्नान'च्या अखंड अमृत परंपरेला कायम ठेवून, मदत कार्यासोबतच सुरक्षित व्यवस्थापनात 'मौनी अमावस्येचे शाही स्नान' करण्याची व्यवस्था करावी.
आम्ही भाविकांना आवाहन करतो की, त्यांनी या कठीण काळात धैर्य आणि संयम बाळगावा. त्यांची तीर्थयात्रा शांततेत पूर्ण करावी. सरकारने आजच्या घटनेपासून धडा घ्यावा आणि भाविकांच्या राहण्याची, जेवणाची, पाण्याची आणि इतर सुविधांसाठी अतिरिक्त व्यवस्था करावी. अश्या मागण्या त्यांनी सोशल पोस्टव्दारे केल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications