संसदेत अदाणींच्या मुद्द्यावर काँग्रेस एकाकी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही हात वर, नेमकं काय घडलं?
Sharad Pawar away from Congress on Adani issue : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कॉंग्रेसने अदाणींच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. परंतु, यामध्ये इंडिया आघाडीच्या अर्थात काँग्रेस पक्षासोबत असलेल्या अन्य पक्षांनी मात्र कॉंग्रेसची साथ सोडल्याचे दिसून आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने देखील कॉंग्रेसच्या अदानी मुद्द्यावरुन जोरदार चपराख लगावली. शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, उद्योगपतीचे कोणाशी संबंध आहेत यापेक्षा जर शेतकरी आणि तरूणांच्या मुद्द्यावर चर्चा केली तर संसदेच्या वेळेचा चांगला उपयोग होईल असे म्हणत कॉंग्रेसला जोरदार टोला लगावला.
काँग्रेसचे इंडिया आघाडीतील इतर सहकारी पक्ष - तृणमूल काँग्रेस (TMC), शिवसेना (ठाकरे) आणि समाजवादी पक्ष (SP) यांनीही या मुद्द्यापासून लढण्यापासून अंतर ठेवल्याचे दिसून आले. फक्त काँग्रेसच संसदेत अदाणींच्या मुद्द्यावर दररोज आंदोलन करत आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाने तर उघडपणे गौतम अदाणी यांच्या चौकशीच्या मुद्द्यापेक्षा इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही अदानी विरोधी कॉंग्रेस भूमिकेवरून टोला लगावत त्या आंदोलनापासून दूर राहणेच पसंद केले.

काय म्हणाले अमोल कोल्हे?
लोकसभेत संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या चर्चेत सहभागी होताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "संविधानाने संसदेला घटनात्मक व्यवस्थेत प्रमुख स्थान दिले आहे. दुर्दैवाने, बऱ्याचदा आपण त्याचे राजकीय रणांगणात रूपांतर झाल्याते अनुभवतो. वैयक्तिक टिप्पणी केल्याने बऱ्याचदा संसदेचं कामकाज थांबवलं जातं. कोणत्या राजकीय नेत्याचे उद्योगांशी संबंध आहेत, कोणता नेता कोणाच्या विमानात कुठे गेला किंवा कोणत्या परदेशातील नेत्याने स्थानिक नेत्याला देणगी दिली.
यापेक्षा आपल्या शेतकरी आणि तरूणांचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत की नाही याची काळजी आपल्या सर्वांना असली पाहिजे. आम्हाला देशासाठी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा हवी आहे, राजकीय घोषणा नको आहेत. सरकार आणि विरोधक या दोन्हीनी हे लक्षात घेतले पाहिजे. पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, शेतकर्यांना त्यांच्या मालाची योग्य किंमत कशी मिळाली पाहिजे आणि तरूणांसाठी चांगल्या रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध झाल्या पाहिजेत यावर खऱ्या अर्थाने काम करणे गरजेचे आहे.
यापूर्वीही शरद पवारांनी घेतली होती सावध भूमिका
काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी समूहावर केलेल्या आरोपांमुळे भारताच्या राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) चौकशीच्या मागणीने जोर धरला, त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसहून वेगळी भूमिका घेतली आणि अदाणी समूहाला अज्ञातांकडून लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले होते.
अदाणी समूदाची भागीदारी असलेल्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी काँग्रेसच्या जेपीसी चौकशीची मागणी पासून स्वत:ला दूर ठेवले आणि या प्रकरणावर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांकडून संसद ठप्प करण्याशी ते सहमत नसल्याचेही सांगितले.
टीएमसीने देखील केले होते आरोप
टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपा आणि काँग्रेस दोन पक्षांना संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याबद्दल दोषी ठरवले. त्यांनी अदाणींच्या मुद्द्यावर अडकलेल्या काँग्रेसवर टीका केली आहे.












Click it and Unblock the Notifications