मुसलमानांची एवढी काळजी तर जिन्नांनाही नव्हती... संजय राऊतांनी सगळंच काढलं; वाचा, राज्यसभेत काय झालं?
मुसलमानांची एवढी काळजी तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती, असं म्हणत आज खा. संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. लोकसभेत काल मध्यरात्री वक्फ दुरुस्ती विधेयक पास झाले. या विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा सुरु आहे. या चर्चेतच शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.

काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी आपल्या भाषणादरम्यान सरकारला लक्ष्य केले. मोहम्मद अली जिन्नांचा आत्मा सरकारमध्ये शिरला असल्याचा टोला त्यांनी लगावला. सरकार हिंदू राष्ट्र नव्हे, तर हिंदू पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा घाणाघात त्यांनी केला. संजय राऊत म्हणाले की, "मी सर्वांचे भाषण ऐकले. गृहमंत्र्यांचे भाषण ऐकले, कायदामंत्र्यांचे भाषण ऐकले, कालपासून तुम्ही लोक मुस्लिमांची बॅरिस्टर जिना यांच्यापेक्षा जास्त काळजी करत आहात. मला असंही वाटलं की जणू बॅरिस्टर जिना यांचा आत्मा त्यांच्या कबरीतून उठून तुमच्या शरीरात घुसला आहे. आधी आपण विचार करायचो की आपण एकत्र येऊन हिंदू राष्ट्र निर्माण करत आहोत, पण आता असे दिसते की तुम्ही हिंदू पाकिस्तान निर्माण करत आहात."
लक्ष्य विचलीत करण्याचा आरोप
संजय राऊत यांनी सरकार मोठ्या मुद्यांवरुन सामान्यांचे लक्ष्य विचलीत करत असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले की, "काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के व्यापार कर आकारण्याची घोषणा केली. यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी, तुम्ही त्याच दिवशी हे विधेयक आणले. ट्रम्प यांनी लादलेल्या कराचा आपल्या देशावर काय परिणाम होईल याबद्दल सभागृहात चर्चा व्हायला हवी होती. आपली अर्थव्यवस्था कोसळेल, आपला रुपया घसरेल. जनता या सर्व गोष्टींबद्दल विचार करत होती, पण तुम्ही त्यांचे लक्ष वळवून त्यांना हिंदू-मुस्लिमच्या मुद्द्यावर आणले."
जमीन घोटाळ्याचा आरोप
संजय राऊत म्हणाले, आयोध्येत १३ हजार एकर जमिनीचा घोटाळा झाला. गृहमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही मोकळ्या जमिनी विकून गरीब मुस्लिम महिलांना मदत करू. पण, अयोध्येत १३ हजार एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे. केदारनाथमध्ये ३०० किलो सोने गायब झाले आहे. धारावीतील जमिनीचेही तेच होणार आहे. काश्मिरी पंडीतांना अजून घर मिळालेले नाही. लडाखमध्ये चीनने कब्जा केला आहे. तुम्ही आमच्या हिंदूंच्या जमिनीचे रक्षण करू शकत नाही आणि मुस्लिमांच्या जमिनींचे रक्षण करण्याची भाषा बोलत आहात", असा टोलाही राऊत यांनी सरकारला लगावला.












Click it and Unblock the Notifications