चर्चा तर होणारच! वडिलांचे मुख्यमंत्रीपद कांद्याने घातले; आता मुलगा मुख्यमंत्री बनून घेणार बदला?
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणाऱ्या प्रवेश वर्मा यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र प्रवेश वर्मा ही काही साधूसुधी हस्ती नाही. दोनदा आमदार व एकदा खासदार असलेले प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. वडिल मुख्मयंत्री, चुलते महापौर अशा मोठ्या राजकीय कुटुंबातून आलेले प्रवेश वर्मा यांची सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्री बसण्याची चर्चा सुरु आहे. प्रवेश वर्मा ज्यांचे पुत्र आहेत, त्या साहिब सिंग वर्मा यांना कांद्याच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, हे तुम्हाला माहिती आहे का? विशेष म्हणजे राजीनामा दिल्यावर ते सरकारी वाहनाने घरी न जाता सार्वजनिक बसने घरी गेले होते, हे सांगूनही खरे वाटत नाही. साहिब सिंग वर्मा यांची हिच कहाणी आपण पाहूयात...

कोण होते साहिब सिंग वर्मा?
दिल्लीच्या राजकारणात ८० च्या दशकात म्हणजेच १९७७ साली साहिब सिंग वर्मा यांनी केशवपुरम वॉर्डचे नगरसेवक म्हणून प्रवेश केला. त्यांची लोकप्रियता वाढल्यानंतर १९९१ साली त्यांना भाजपने बाह्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिली. परंतु काँग्रेसचे दिग्गज नेते सज्जन कुमार यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र ते थांबले नाहीत. १९९३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चमकदार कामगिरी केली आणि ७० पैकी ४९ जागा जिंकून सरकार स्थापन केले. त्यावेळी मुख्यमंत्रीपद मदनलाल खुराणा यांच्याकडे गेले आणि साहीब सिंग वर्मा यांना शिक्षण आणि विकास मंत्री करण्यात आले.
अचानक झाले मुख्यमंत्री
१९९६ मध्ये जेव्हा मदनलाल खुराणा यांचे नाव जैन हवाला घोटाळ्यात आले. तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर दिल्लीत नवीन मुख्यमंत्र्यांचा शोध सुरू झाला. केंद्रीय नेतृत्वात सुषमा स्वराज आणि हर्षवर्धन यांच्या नावांची चर्चा सुरू होती. परंतु आमदारांच्या बैठकीत तिसरे नाव पुढे आले. ते नाव होते साहिब सिंग वर्मा यांचे. ३१ आमदारांच्या पाठिंब्यानंतर ते दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री बनले.
कांद्याने केला घात
साहिब सिंग वर्मा अचानक मुख्यमंत्री झाले खरे, मात्र त्यावेळी सत्तेत अनेक आव्हाने होती. वर्मा यांना खुराणा गटाशी संघर्ष करण्याबरोबरच इतर अनेक स्थानिक समस्यांचा सामना करावा लागला होता. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजेच १९९८ मध्ये कांद्याच्या किमतींनी आस्मान गाठले. कांद्याचा दर ६०-८० रुपये किलो झाला. हिच संधी साधून काँग्रेसने महागाईविरुद्ध मोहीम सुरू केली. भाजपला कोंडीत पकडले. लोकांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी साहिब सिंग वर्मा त्यांच्या "गरीब माणूस कांदा खात नाही" विधानाने कोंडीत सापडले, आणि चौफेर टिका सुरु झाली.
भाजपचा झाला नाईलाज
नाराजी वाढल्यानंतर भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी साहिब सिंग वर्मा यांना पदावरुन हटवले. त्यांनी १२ ऑक्टोबर १९९८ रोजी त्यांचा राजीनामा घेतला. साहिब सिंग वर्मा यांच्या मुंडका या मुळ गाव राजीनामा देऊन निघाले. त्यावेळी विधानसभेत त्यांच्या चाहत्यांची गर्दी होती. बाहेर गाड्यांचा ताफा होता, मात्र ते एका सामान्य माणसाप्रमाणे डीटीसी बसने गावी गेले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढच्यात वर्षी म्हणजे १९९९ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून ते खासदार झाले. २००२ मध्ये वाजपेयी सरकारमध्ये कामगार मंत्रीपदही भुषविले. कांद्यामुळे मुख्यमंत्रीपद गेलेले वर्मा कुटुंब, आता दुसऱ्या पिढीत पुन्हा ते पद मिळविण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत प्रवेश वर्मा यांचे नाव घेतले जात आहे.












Click it and Unblock the Notifications