अग्निवीर योजनेचा फेरआढावा घ्या; जेडीयूची मागणी
Mumbai: केंद्रात भाजपचे एकपक्षीय बहुमत जाताच महायुतीमधील घटक पक्षांनी आपल्या मागण्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. सैन्यात तरुणांच्या भरतीसाठी सुरु करण्यात आलेल्या अग्निवीर योजनेचा फेर आढावा घ्यावा, अशी मागणी नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने केली आहे.
अग्निवीर योजनेला अनेकांचा विरोध आहे. त्याचा फटका रालोआला अनेक ठिकाणी बसला आहे त्यामुळे या योजनेचा पुन्हा आढावा घेण्यात यावा अशी मागणी संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते त्यागी यांनी केली. समान नागरी कायद्याला आपला विरोध नाही, मात्र त्याच्याशी संबंधित घटकांशी चर्चा करण्यात यावी अशी मागणीही संयुक्त जनता दलाने केली आहे.

अग्निवीर योजनेला सुरुवातीपासूनच विरोधकांनी लक्ष केले आहे. ही योजनाच बंद करावी अशी मागणी राहुल गांधी यांनी लावून धरली. आता रालोआ मधील घटक पक्ष तशीच मागणी करू लागले आहेत. संयुक्त जनता दलाच्या मागणीचे कॉंग्रेसने स्वागत केले आहे.
दुसरीकडे महत्वाच्या मंत्रिपदांची मागणी संयुक्त जनता दल आणि तेलगु देसम यांनी केल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. चार खासदारामागे एक मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी संयुक्त जनता दलाने केल्याचे सांगण्यात येते. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संयोजकपद आणि लोकसभेचे अध्यक्षपद आपल्या पक्षाला देण्यात यावे, अशी मागणी तेलगु देसम पक्षाने केल्याचे सांगण्यात येत आहे.
नितीश बाबू, चंद्राबाबू यांच्याकडे विरोधकांचे लक्ष
खेळ अजून संपलेला नाही, अशी पोस्ट कॉंग्रेसने केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तरी त्यांचे सरकार टिकणार नाही, असा दावा उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते संजय राउत यांनी केला आहे. रालोआ मध्ये बाबू अनेक आहेत. नितीश बाबू, चंद्राबाबू, चिरागबाबू अशा अनेक बाबुंकडे आमचे लक्ष आहे, असे संजय राउत म्हणाले.
त्वरित सरकार बनवा; नितीश
सरकार त्वरित बनवा, अशी सूचना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. आम्ही रालोआ सोबतच राहणार आहोत असेही त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले आहे.
वेगळा विचार करण्याचा प्रश्नच नाही : नायडू
आम्ही सोबत निवडणूक लढलो आहोत. त्यामुळे वेगळा विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहे. भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र नवनव्या चर्चांना उधाण आले आहे. हे सरकार स्थापन झाले तरी जास्त दिवस टिकणार नाही असा दावाही विरोधकांकडून केला जातोय.












Click it and Unblock the Notifications