रेल्वेकडून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल, 1 जुलैपासून ‘हे’च लोक करू शकतील बुकिंग
भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट बुकिंगसंबंधी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 जुलै 2025 पासून, तत्काळ तिकीट फक्त आधार कार्ड प्रमाणीकरण केलेल्या प्रवाशांनाच बुक करता येणार आहे. हा बदल एजंटांकडून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना तिकीट सहज मिळावं यासाठी करण्यात आला आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केली. नव्या नियमानुसार, तत्काळ तिकीट फक्त IRCTC ची अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरूनच बुक करता येणार आहे. प्रवाशांचे आधार कार्ड आधीपासून IRCTC खात्यात जोडलेले (लिंक केलेले) आणि प्रमाणीत असणे आवश्यक आहे.
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, 15 जुलै 2025 पासून, तिकीट बुक करताना प्रवाशाच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP (वन टाईम पासवर्ड) पाठवण्यात येईल. प्रवाशाने हा OTP भरल्यानंतरच तिकीट बुक होईल. हीच पद्धत रेल्वेच्या संगणकीकृत तिकीट काउंटरवर आणि अधिकृत एजंटांकडेही लागू राहील. OTP न भरल्यास तिकीट दिलं जाणार नाही.
या नव्या नियमामुळे सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, कारण रेल्वे एजंट तत्काळ तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या ३० मिनिटांपर्यंत तिकीट बुक करू शकणार नाहीत.
AC क्लासच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी वेळ सकाळी १० वाजता असतो, पण एजंटांना १०:३० वाजेपर्यंत थांबावं लागेल.
नॉन-AC क्लाससाठी बुकिंग सकाळी ११ वाजता सुरू होतं, पण एजंटांना ११:३० वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.
रेल्वेने सांगितले की, काही एजंट प्रवाशांच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून त्याद्वारे तिकीट बुक करत होते. त्याच नावाने प्रवाशांना बनावट आधार कार्ड देऊन त्यांच्याकडून जास्तीचे पैसे घेतले जात होते. त्यामुळे मे २०२५ मध्ये रेल्वेने सुमारे अडीच कोटी बनावट IRCTC आयडी ब्लॉक केले आहेत.
नवीन नियम लागू झाल्यानंतर एजंटांचा गैरवापर थांबेल आणि सामान्य प्रवाशांना तत्काळ तिकीट मिळवणे अधिक सोपे होईल.












Click it and Unblock the Notifications