'मोदींनी देश अमेरिकेला विकण्याचा सौदा केला!'; राहुल गांधींचा भोपाळच्या 'किसान महाचौपाल'मधून हल्लाबोल
Rahul Gandhi Alleges PM Modi : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काँग्रेसतर्फे आयोजित 'किसान महाचौपाल'मध्ये बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
"पंतप्रधान मोदींनी देश अमेरिकेला विकण्याचा सौदा केला असून, अदानी आणि एपस्टाईन प्रकरणाच्या दबावाखाली त्यांनी भारतीय शेतकऱ्यांचा डेटा अमेरिकेला दिला आहे," असा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

एपस्टाईन आणि अदानी प्रकरणाचा दबाव
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर आणि अमेरिकेसोबतच्या करारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "पंतप्रधानांवर सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर एपस्टाईन आणि अदानी प्रकरणांमुळे मोठा दबाव आहे. याच दबावापोटी त्यांनी भारत आणि इथल्या शेतकऱ्यांशी संबंधित गोपनीय डेटा अमेरिकेला विकला आहे."
करार रद्द करण्याचे आव्हान
राहुल गांधी म्हणाले की, जर तुमच्यात हिंमत असेल, तर अमेरिकेसोबतचे हे अन्यायकारक करार रद्द करून दाखवा. पण अदानी आणि एपस्टाईनच्या धमकीमुळे तुम्ही ते करू शकत नाही," असे थेट आव्हान त्यांनी मोदींना दिले.
संसदेत आवाज दाबल्याचा आरोप
लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आपल्याला बोलू दिले जात नसल्याची खंत राहुल गांधींनी व्यक्त केली. "भारतीय इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला संसदेत बोलण्यापासून रोखले जात आहे.
मला चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावर आणि माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकातील संदर्भावर बोलायचे होते, पण माझा आवाज दाबण्यात आला. नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा चीनने घुसखोरी केली, तेव्हा भारत सरकारने लष्कराला साथ देण्याऐवजी त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून दिले.
मल्लिकार्जुन खरगे यांची 'सरंडर मोदी' म्हणून टीका
या महाचौपालमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधानांवर बोचरी टीका केली.
ऑपरेशन सिंदूर आणि ट्रम्प: खरगे म्हणाले की, "डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सांगितले होते की त्यांनी भारत आणि पाकिस्तानला सांगून 'ऑपरेशन सिंदूर' थांबवले. मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. ते 'नरेंद्र मोदी' नसून 'सरंडर मोदी' आहेत."
काँग्रेसचा वारसा : "मोदीजींचा जन्म काँग्रेसच्या राजवटीत झाला, त्यांनी त्यांचे नाव बदलले पाहिजे. ते रोज चहा पिताना देश विकण्याच्या गप्पा मारतात का?" असा सवालही खरगे यांनी उपस्थित केला.
भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांत थरार
या किसान महाचौपाल दरम्यान भोपाळमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. सभेच्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यावरून काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
एसीपी ट्रॅफिक अजय वाजपेयी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवाहर चौक, माता मंदिर आणि न्यू मार्केट परिसरातील वाहतूक वळवण्यात आली होती, तरीही मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
ट्रम्प आणि जागतिक व्यापार शुल्क
राहुल गांधींनी भाषणात जागतिक व्यापाराचा संदर्भ देत सांगितले की, "ट्रम्प यांनी शुल्क रद्द करण्याचे जाहीर केले आणि ते करून दाखवले. इतर देशांनीही आपापल्या हिताचे निर्णय घेतले, पण पंतप्रधान मोदी मात्र या विषयावर मौन बाळगून आहेत, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे."












Click it and Unblock the Notifications