पंतप्रधान मोदींचे 'ऑपरेशन सिंदूर'वरील आरोपांना जोरदार उत्तर; काँग्रेसवर 'पाकिस्तान रिमोट'चा आरोप!
PM Modi On Operation Sindoor : आज लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर' आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पहलगाममधील पीडितांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. अमेरिकेच्या दबावाखाली युद्धबंदी जाहीर केल्याचा दावाही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावला, तसेच काँग्रेसवर 'रिमोट पाकिस्तानकडे' असल्याचा गंभीर आरोप केला.
ऑपरेशन सिंदूरवरील टीकेला मोदींचे सडेतोड प्रत्युत्तर
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यावर आणि 'ऑपरेशन सिंदूर'वर संपूर्ण देश एकवटला होता आणि त्याला जगाचा पाठिंबा मिळाला होता, अशावेळी आपल्याच देशातील विरोधी पक्षांनी त्यावर प्रश्न उपस्थित करणे हे दुर्दैवी आहे. 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रश्न विचारून विरोधक पहलगाममधील निष्पाप पीडितांच्या भावना दुखावत आहेत, असेही ते म्हणाले.

अमेरिकेच्या दबावाचा दावा फेटाळला!
'ऑपरेशन सिंदूर' नंतर अमेरिकेच्या दबावाखाली युद्धबंदी जाहीर करण्यात आली, या आरोपाचे पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दात खंडन केले. ते म्हणाले, "९ मे च्या रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु माझी त्यावेळी सैन्यासोबत महत्त्वाची बैठक सुरू होती." याचा अर्थ, कोणताही परदेशी दबाव भारताच्या निर्णयावर परिणाम करू शकत नाही, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले.
हमारी सेना ने 22 अप्रैल का बदला 22 मिनट में ले लिया!#ModiGovtAgainstTerror pic.twitter.com/0PpRq6U8jU
— BJP (@BJP4India) July 29, 2025
'काँग्रेसचा रिमोट पाकिस्तानकडे'; मोदींचा गंभीर आरोप
पंतप्रधानांनी विशेषतः काँग्रेसवर निशाणा साधला. "काँग्रेस पक्षाचा रिमोट पाकिस्तानकडे आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला. देशाच्या सुरक्षेच्या आणि सार्वभौमत्वाच्या मुद्द्यांवरही विरोधक राजकारण करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यांच्या क्षुद्रपणामुळे संपूर्ण देशाचे मनोबल खालावले आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी काव्यात्मक शैलीत काँग्रेसवर टीका करताना एक कविताही वाचून दाखवली, ज्यामुळे सभागृहात गंभीर वातावरण निर्माण झाले. त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर', पाकिस्तानमधील दहशतवादी तळांचा नाश आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काही कथित चुकांचाही उल्लेख केला.
राफेल विमानांवरील प्रश्नांना मौन
या सर्व घडामोडींमध्ये, एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मात्र पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानने भारताची 5 राफेल विमाने पाडली, असा दावा काही परदेशी माध्यमांच्या वृत्तांमध्ये करण्यात आला होता.
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी यावर स्पष्टीकरण मागितले होते. त्यांनी केंद्र सरकारने 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतीय लष्करी आस्थापनांचे किती नुकसान झाले, किती लढाऊ विमाने, विशेषतः राफेल विमानांचे नुकसान झाले आणि किती सैनिक शहीद झाले, हे स्पष्ट करावे अशी मागणी केली होती.
पंजाबमधील अमृतसर येथील काँग्रेस खासदार गुरजीत सिंग औजाला यांनी तर सरकारने ३५ राफेल विमानांची परेड करावी, जेणेकरून सत्य देशासमोर येईल, असे म्हटले होते. परंतु पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात या दाव्यांवर कोणतेही उत्तर दिले नाही, ज्यामुळे विरोधकांना पुन्हा टीकेसाठी एक मुद्दा मिळाला आहे.
पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधातील सरकारची भूमिका आणि राष्ट्रीय सुरक्षेवरील कटिबद्धता अधोरेखित केली असली, तरी राफेल विमानांच्या नुकसानीच्या दाव्यांवर त्यांचे मौन लक्ष वेधून घेणारे ठरले आहे. यावर पुढील काळात राजकीय वर्तुळात आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications