पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, GST सुधारणांमुळे खरेदी करणे सोपे, 'बचत उत्सवा'चा होणार मोठा फायदा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सायंकाळी देशाला संबोधित करताना एक मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, २२ सप्टेंबरच्या सकाळपासूनच देशभरात 'जीएसटी बचत उत्सव' सुरू होईल. या ऐतिहासिक बदलामुळे प्रत्येक वर्गातील नागरिकांच्या खिशाला थेट फायदा होणार आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन केली आणि या निर्णयाला देशाच्या आर्थिक बळकटीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले.

'बचत उत्सव' ने प्रत्येक कुटुंबाला दिलासा
पंतप्रधान मोदींनी सांगितले की, या बचत उत्सवाचा लाभ गरीब, मध्यमवर्ग, न्यू मिडिल क्लास, शेतकरी, महिला आणि व्यापारी अशा सर्वांना मिळेल. सणासुदीच्या या काळात लोकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू स्वस्त दरात खरेदी करता येतील. मोदी म्हणाले, "प्रत्येक घरात आनंद असेल, प्रत्येक कुटुंबाच्या चेहऱ्यावर गोडवा असेल. हा सुधार भारताच्या विकासाच्या कथेला नवी गती देईल."
गुंतवणूक आणि व्यवसायावर सकारात्मक परिणाम
पंतप्रधानांनी सांगितले की, नवीन जीएसटी रचनेमुळे व्यवसाय करणे सोपे होईल. देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांना भारत एक अधिक आकर्षक बाजारपेठ वाटेल. या सुधारणेमुळे प्रत्येक राज्याला समान संधी मिळेल आणि विकासाचा वेग वाढेल, यावरही त्यांनी भर दिला.
जीएसटीच्या जुन्या अडचणींची आठवण
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी २०१७ पूर्वीच्या परिस्थितीची आठवण करून दिली. ते म्हणाले की, "एकेकाळी देशात करप्रणालीचे जाळे अत्यंत गुंतागुंतीचे होते. अनेक प्रकारचे कर आणि वेगवेगळ्या नियमांमुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पाठवणे एका परीक्षेपेक्षा कमी नव्हते. तपासणी नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असायच्या आणि व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते."
WATCH LIVE: Prime Minister Shri @narendramodi’s special address to the nation. https://t.co/eTH7U5jBAw
— BJP (@BJP4India) September 21, 2025
आता सुकर होईल वाट
मोदी म्हणाले की, जीएसटीच्या माध्यमातून ही गुंतागुंतीची प्रणाली संपुष्टात आणली गेली आणि आता पुढील टप्प्याची सुरुवात होत आहे. २२ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही नवीन कररचना केवळ ग्राहकांसाठीच नाही, तर व्यापाऱ्यांसाठीही एक पारदर्शक आणि सोपी व्यवस्था निर्माण करेल.
नवरात्रीची खास भेट
पंतप्रधान मोदींनी भाषणाच्या शेवटी सांगितले की, नवरात्रीसारख्या शुभप्रसंगी ही सुधारणा 'आत्मनिर्भर भारता'च्या अभियानाला आणखी बळकट करेल. या बचत उत्सवाचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले.












Click it and Unblock the Notifications