संसदेचे अधिवेशन सुरु; अदानी प्रकरणावरुन गोंधळाची शक्यता, 'या' 16 विधेयकांवर होणार चर्चा
केंद्र सरकारने काल म्हणजेच रविवारी बोलविलेल्या सर्वपक्षिय बैठकीकडे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली. आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालेल. अदानी उद्योगसमूहाविरुद्ध अमेरिकेत निश्चित झालेल्या लाचखोरीच्या आरोपांवर या अधिवेशनात सर्वप्रथम चर्चा करण्याची आग्रही मागणी विरोधकांनी या बैठकीत केली. त्यामुळे या अधिवेशन अभूतपुर्व गोंधळ पहायला मिळण्याची शक्यता आहे.

अधिवेशनात 16 विधेयकांवर होणार चर्चा
आजपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालेल. सरकारने या अधिवेशनासाठी 16 विधेयकांवर चर्चा करण्याचे नियोजन केले आहे. तत्पूर्वी रविवारी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बोलावलेल्या बैठकीत विरोधकांनी मणिपूर हिंसाचार, उत्तर भारतातील प्रदूषण आणि रेल्वे अपघात आदी विषयांवरही चर्चेची मागणी केली. अदानी उद्योग समूहावरील अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांचा मुद्दा त्यांनी लावून धरला. संरक्षणमंत्री राजनाथसिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
एक देश एक निवडणुकीवरही होणार चर्चा
सरकारने अधिवेशनात चर्चा व मंजुरीसाठी 'वक्फ' दुरुस्तीसह 16 विधेयके सूचिबद्ध केली आहेत. 'एक देश, एक निवडणूक' विधेयक मांडले जाण्याची शक्यता नाही. पूरक अनुदान मागण्यांना दोन्ही सभागृहांची मंजुरी, पंजाब न्यायालये सुधारणा कायदा, कोस्टल शिपिंग आणि भारतीय बंदरे विधेयक आदी विधेयकांवर चर्चा होणार आहे.
बैठकीला बड्या नेत्यांची दांडी
रविवारी बोलविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, काँग्रेसचे के. सुरेश, गौरव गोगोई हे उपस्थित होते. मात्र, बहुतेक पक्षांच्या मुख्य नेत्यांनी दांडी मारली. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह तृणमूल काँग्रेस, द्रमुक, माकप, आम आदमी पक्ष आदींचे संसदेतील नेतेही या बैठकीसाठी संसदेकडे आले नाहीत.












Click it and Unblock the Notifications