संसद अधिवेशनाच्या 2ऱ्या दिवशी सभागृहात काय-काय घडलं, धनखड राजीनामा अन् 'या' मुद्द्यावरुन गदारोळ!
parliament monsoon session 2025 Update News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस (22 जुलै 2025) पूर्णपणे गोंधळाने भरलेला होता. सोमवारी रात्री उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ झाला.
याशिवाय, बिहारमधील मतदार यादी सुधारणा (SIR) च्या मुद्द्यावरूनही लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गोंधळ दिसून आला. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले आणि अखेरीस, दिवसभराच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहे बुधवारपर्यंत (23 जुलै 2025) तहकूब करण्यात आली.

धनखड यांच्या राजीनाम्यावरून गोंधळ!
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचा मुद्दा सकाळी कामकाज सुरू होताच तापला. राज्यसभा आणि लोकसभेतही विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षांनी धनखड यांच्या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गोंधळ घातला.
यावर भाजप खासदार रवी किशन यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, विरोधी पक्ष कोणाच्याही आजाराला मुद्दा बनवत आहे. एक व्यक्ती आजारी आहे, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यानंतरही यावर गदारोळ होत आहे, हे दुर्दैवी आहे.
संसदेत दिवसभर गोंधळ, चर्चा नाही
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कामकाज सुरू होताच गोंधळ सुरू झाला आणि तो दिवसभर कायम राहिला. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विरोधी पक्षांच्या गदारोळावर प्रतिक्रिया देत म्हटले की, सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे, परंतु विरोधी पक्षांना चर्चा नको असून त्यांना केवळ गोंधळ करायचा आहे. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरुवातीला काही मिनिटांतच १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
कामकाज वारंवार तहकूब
सकाळ : कामकाज सुरू होताच गोंधळ. लोकसभा आणि राज्यसभा 12 वाजेपर्यंत तहकूब.
दुपार : राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी घोषणाबाजी सुरू ठेवली, ज्यामुळे ते 2 वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
दुपारी २ नंतर : लोकसभेत काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांचे सदस्य घोषणाबाजी करत होते. सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना अनेक वेळा जागेवर बसण्यास सांगितले.
त्यांनी चर्चेसाठी सर्व खासदारांचे सहकार्य आवश्यक असल्याचे म्हटले. मात्र, परिस्थिती नियंत्रणात न आल्याने सभागृहाचे कामकाज 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
सायंकाळ : गोंधळ कमी होत नसल्याने अखेरीस दोन्ही सभागृहांचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
बीएसीची (BAC) बैठक
राज्यसभेची बीएसीची (Business Advisory Committee) बैठक सायंकाळी ५.३० वाजता संसदेत झाली. ही बैठक यापूर्वी सोमवारीच होणार होती, परंतु काही कारणांमुळे ती झाली नाही. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस पूर्णपणे गोंधळाच्या भक्ष्यस्थानी पडला, ज्यामुळे कोणतीही ठोस चर्चा होऊ शकली नाही. आता सर्वांच्या नजरा बुधवारच्या कामकाजाकडे लागल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications