कोण आहे हिमांशी नरवाल?, पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी मुस्लिमांबद्दल अशी काय बोलली, की लोक संतापले!
Who is Himanshi Narwal : दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल 22 तारखेला जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये लेफ्टनंट जनरल विनय नरवाल यांना देखील दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. धक्कादायक म्हणजे त्यांचे लग्न होऊन अवघे सहा दिवसच झाले होते, यात त्यांची पत्नी हिमांशी नरवाल यांचे कुंकू पुसले गेले अन् लग्नाच्या सहाव्या दिवशीच विधवा व्हावं लागलं. धर्म विचारून दहशतवाद्यांनी लोकांना मारल्याचे समोर आले. या घटनेनंतर हिमांशी नरवालच्या पाठिशी संपूर्ण देश उभा राहिला.

दरम्यान, या हल्ल्यानंतर आता देशभरात हिंदू-मुस्लिम वादाला तोंड फुटले आहे. काही धर्मांध संस्थांकडून तसा प्रचार देखील केला जात असल्याचे चित्र समाजात पाहायला मिळत आहे. हिंदू मुस्लिम अन् दहशतवादावरील चर्चेला आता गल्लोगल्ली तोंड फुटलेले आहे. दरम्यान, हिमांशी नरवाल यांनी माध्यमांशी बोलताना एक विधान केले. त्यावरुन आता हिमांशीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी जिच्या पाठिशी संपूर्ण देश सहानुभूती व्यक्त करत होता, त्यानंतर आता हिमांशी यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. नेमकं असं काय विधान केले, त्यामुळे हिमांशी ट्रोल होऊ लागली आहे. चला तर जाणून घेऊया, हिमांशी नरवाल कोण आहे, तिचे शिक्षण कुठून झाले. व लोक तिला नेमकं का निशाणा करत आहेत.
कोण आहे हिमांशी नरवाल?
काही मीडियाच्या माहितीनुसार, 24 वर्षीय हिमांशी नरवाल ही पीएचडी स्कॉलर आणि शिक्षिका आहे. हिमांशी ही मूळची हरियाणातील गुरुग्रामची आहे. हिमांशीचे वडील सुनील कुमार गुरुग्राममध्ये उत्पादन शुल्क आणि कर अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिची आई पूनम या गृहिणी आहेत. ती ऑनलाइन कोचिंग क्लासेस देखील चालवते. हिमांशी नरवाल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर कायम सक्रिय असते. "बुलेट लव्हर" आणि "माझे पहिले प्रेम माझी आई" या संदर्भात कायम पोस्ट करत असते.
काश्मिरींबद्दलच्या विधानानंतर का ट्रोल झाली?
नुकताच दहशतवादी हल्ल्यात ठार झालेला हिमांशी नरवालचा पती लेफ्टनंट विनय नरवालचा 1 मे रोजी वाढदिवस होता. त्याच्या स्मरणार्थ हिमांशी आणि तिच्या कुटुंबाने कर्नालमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, ज्यामध्ये तिने तिच्या पतीच्या स्मरणार्थ लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. तर स्थानिक लोकांनी देखील या शिबीराला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.
पतीला वाहिली श्रद्धांजली
याच कार्यक्रमात हिमांशीने तिच्या पतीच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर लावली आणि स्टेजवरुन तिला भावनिक श्रद्धांजली वाहिली. हिमांशीने संकेत दिला आहे की, ती तिच्या पतीच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक कार्य आणि शांती संदेशांद्वारे त्याचा विचार पुढे नेणार आहे.
म्हणाली- आम्हाला न्याय हवा, मुस्लिमांना दोष नाही
या प्रसंगी बोलताना हिमांशीने महत्वाचे विधान केले. धर्म पाहून जरी दहशतवाद्यांनी हल्ला केला असला, तरी हिमांशीने लोकांना काश्मिरी लोक आणि मुस्लिमांना लक्ष्य करू नका, असे आवाहन केले. तर आम्हाला न्याय हवा, ज्यांनी हल्ला केला त्यांनाच शिक्षा व्हायला पाहिजे, असे विधान केले. या विधानानंतर लगेचच सोशल मीडियावर तिच्यावर टीका करण्यात आली. तिच्या पतीला त्याच्या धर्माबद्दल विचारल्यानंतरच त्याची हत्या करण्यात आली. त्यावरुन लोकांनी हिमांशीवर टीका करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर काही लोकांनी तिने मांडलेल्या विचारांना समर्थन देखील दिले.
दुसरीकडे मृत पावलेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या वडिलांनी सरकारकडे मागणी केली आहे की, त्यांच्या मुलाला शहीदाचा दर्जा देण्यात यावा आणि त्याच्या नावाने वैद्यकीय विद्यापीठाची स्थापना केली जावी.












Click it and Unblock the Notifications