ऑपरेशन सिंदूरवरून वाद: 1991 च्या करारावरून काँग्रेस-भाजप आमने-सामने
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेला "ऑपरेशन सिंदूर" जगभरात कौतुकास पात्र ठरला असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या कारवाईबाबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले.

त्यांच्या या टीकेनंतर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी 1991 साली भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या एका महत्त्वाच्या कराराची आठवण करून देत काँग्रेसला धारेवर धरले आहे.
राहुल गांधींनी विचारले - पाकला आधी माहिती का?
राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला की, भारताने ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकिस्तानला हल्ल्याची माहिती का दिली? त्यांच्या या आरोपावर निशिकांत दुबे यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर 1991 च्या कराराचे दस्तऐवज शेअर केले आणि सांगितले की, काँग्रेसच्याच सरकारने पाकिस्तानसोबत सैन्य हालचालीची पूर्वसूचना देण्याचा करार केला होता.
काय आहे 1991 चा भारत-पाकिस्तान करार?
हा करार 6 एप्रिल 1991 रोजी करण्यात आला होता. यामध्ये दोन्ही देशांनी ठरवले की, ते एकमेकांना सैन्य सराव, हालचाली, वायूदलाच्या हालचाली यांची माहिती पूर्वीच देतील. यामध्ये वायुसेना, नौसेना आणि स्थलसेनेच्या हालचालींचा समावेश होता.
कराराचा उद्देश काय होता?
या कराराचा मुख्य उद्देश अनपेक्षित संघर्ष किंवा हवाई क्षेत्राच्या उल्लंघन टाळणे हा होता.
त्यानुसार,
- दोन्ही देशांनी एकमेकांच्या 10 किमी हवाई क्षेत्रात प्रवेश टाळायचा.
- हवाई ओळख क्षेत्र (Air Security Identification Zone) मध्ये कोणतीही उड्डाणे परवानगीशिवाय केली जाणार नाहीत.
- जल व हवाई मार्गांमध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक राहील.
निशिकांत दुबेंचे काँग्रेसवर टीकास्त्र
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना उद्देशून म्हटले की,
"राहुल गांधीजी, 1991 मधील हा करार तुमच्या पक्षाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या सरकारने केला होता. मग आज तुम्ही परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांच्यावर आरोप कसे करू शकता?"
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "1991 मध्ये चंद्रशेखर यांचे सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर होते, आणि 1994 मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांचे सरकार होते. तेव्हाच या कराराची अंमलबजावणी झाली होती, ज्यामध्ये वायुसेनेच्या, नौसेनेच्या तैनातीचा तपशील आणि युद्धसरावाची माहिती देण्याचे नियम होते."
काँग्रेसचा प्रत्युत्तरवार
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी निशिकांत दुबेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, निशिकांत दुबे वारंवार अज्ञानाचे दर्शन घडवत आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी 6 मार्च 1991 रोजी चंद्रशेखर सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता, तर हा करार एप्रिल 1991 मध्ये झाला. तेव्हा शांतता काळ होता, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आपण एका दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे."
निशिकांत दुबे अप्रत्यक्षपणे मान्य करत आहेत की, एस. जयशंकर यांनी खरोखर पाकिस्तानला माहिती दिली होती. जशी की राहुल गांधी म्हणत आहेत असही त्या म्हणाल्या.
1991 चा भारत-पाकिस्तान करार सध्या राजकीय वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. एकीकडे भाजप काँग्रेसला त्यांच्या भूतकाळातील निर्णयावरून जबाबदार धरत आहे, तर काँग्रेस सध्याच्या सरकारवर हल्ला करत आहे की त्यांनी "सैन्य कारवाईपूर्वी पाकिस्तानला सूचित" का केले?
सध्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, हा वाद केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न राहता, राष्ट्रीय सुरक्षेच्या नीती आणि आंतरराष्ट्रीय करारांच्या प्रभावांवर नव्याने विचार करण्याची गरज भासत आहे.












Click it and Unblock the Notifications