मुंबई ते दुबई अवघ्या 2 तासांत प्रवास तो ही समुद्र मार्गाने! 'हा' रेल्वे प्रकल्प घडवेल जगात क्रांती!
Mumbai to Dubai Train News : मुंबई ते दुबई प्रवास फक्त अवघ्या 2 तासांमध्ये होणार आहे. होय हे स्वप्न नाही तर सत्यात उतरवणारा हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. तुम्हाला वाटेल की, हे कसे शक्य आहे. पण यासंदर्भात संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय सल्लागार ब्युरो लिमिटेडच्या वतीने हा प्लॅन आखला जात आहे.
काही माध्यमांच्या अहवालानुसार, संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय सल्लागार ब्युरो लिमिटेडच्या वतीने दुबई आणि मुंबई दरम्यान एक अंडर वॉटर रेल्वे लिंक प्रस्तावित करण्यात आली आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील प्रवास वेळ अवघ्या दोन तासांमध्ये होणार आहे. ही हाय-स्पीड ट्रेन ताशी 700 ते 1000 किमी वेगाने धावेल. हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी प्रस्तावित करण्यात आला होता, परंतु त्याच्या मंजुरी किंवा विकासाबाबत कोणतेही मोठे अपडेट सद्या आलेले नाही.

मनीकंट्रोल तसेच आज तकच्या वृत्तानुसार, नॅशनल अॅडव्हायझर ब्युरो लिमिटेडचे प्रतिनिधित्व करणारा दावा करणाऱ्या एका यूट्यूब अकाउंटने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये रेल्वे लिंक बांधल्यानंतर कशी दिसेल हे दाखवले आहे. तथापि, त्याच्या जटिल अभियांत्रिकी आवश्यकतांमुळे, या प्रकल्पात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक देखील करावी लागणार आहे, असे त्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
मुंबई आणि दुबईमधील अंतर किती आहे?
मुंबई आणि दुबईमधील हवाई अंतर अंदाजे 1928 किलोमीटर आहे. दोन्ही देशांमधील रस्त्याने अंतर सुमारे 6,628 किलोमीटर (4,118 मैल) आहे, जे चालविण्यासाठी सुमारे 3 दिवस आणि 11 तास लागतात, तर दोन्ही देशांमधील जलमार्ग (समुद्री अंतर) सुमारे 1,172 नॉटिकल मैल (2,127 किलोमीटर) आहे.
जर प्रस्ताव मंजूर झाला तर रेल्वे लिंक 2030 पर्यंत पूर्ण होऊ शकेल. भारत आणि युएई दरम्यान व्यापार आणि वाहतूक कार्यक्षमता सुधारण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाचे आहे. दोन्ही शहरांमध्ये प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या हवाई प्रवासाला पर्याय म्हणून अंडरवॉटर रेल्वे प्रवासाकडे पाहिले जात आहे. यामुळे भारत आणि युएई दरम्यान कच्च्या तेलासह वस्तूंची वाहतूक सुलभ होऊ शकते, ज्यामुळे व्यापारी संबंध मजबूत होण्यास मदत होईल.

भारताने नुकतेच अंडरवॉटर रेल्वे प्रकल्प पूर्ण केला
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, भारताने नुकतेच अंडरवॉटर मेट्रोच्या यशस्वी ऑपरेशनमध्ये यश मिळवले आहे. ते एका वर्षापूर्वी देशात लाँच करण्यात आले होते. हा 520 मीटर लांबीचा बोगदा आहे, जो हावडा आणि कोलकाता यांना जोडतो. या नवीन प्रकल्पात, इलेक्ट्रोमॅग्नेट वापरून गाड्या बोगद्यात उचलल्या जातील. याला मॅग्लेव्ह तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते. जे ट्रेनला 1000 किमी प्रतितास वेगाने घेऊन जाईल. अशाच प्रकारे, दुबई ते मुंबई हा प्रवास फक्त 2 तासांत पूर्ण करता येऊ शकतो, असा दावा देखील तंत्रज्ञानांकडून केला जात आहे.
अंडर वॉटर रेल्वे प्रोजेक्ट काय आहे?
नॅशनल अॅडव्हायझर ब्युरो लिमिटेडने या प्रकल्पाची कल्पना 6 वर्षांपूर्वी अबू धाबी येथील यूएई-इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये दिली होती. अब्दुल्ला शेही यांनी काढलेल्या या प्रकल्पाच्या रूपरेषेनुसार, भारतातील मुंबईला दुबईतील फुजैराहशी अल्ट्रा-स्पीड फ्लोटिंग ट्रेन्सद्वारे जोडण्याची योजना आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट द्विपक्षीय व्यापाराला चालना देणे आहे.
फुजैरा बंदरातून भारतात तेल निर्यात केले जाईल आणि मुंबईच्या उत्तरेकडील नर्मदा नदीतून जास्तीचे पाणी दुबईला आणले जाईल. याशिवाय, या मार्गावर गाड्या धावतील ज्याद्वारे प्रवासी मुंबई ते दुबई आणि दुबई ते मुंबई प्रवास देखील करू शकणार आहेत.
राष्ट्रीय सल्लागार ब्युरोचे नेमकं काम काय आहे?
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल अॅडव्हायझर ब्युरो लिमिटेड ही एक कन्सल्टन्सी फर्म आहे. जी स्टार्ट-अप्स आणि मोठ्या व्यावसायिक घराण्यांसाठी काम करते. दुबईच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, या कंपनीने अंटार्क्टिकामधून हिमखंड ओढून दुबईच्या समुद्रात आणण्याची क्रांतिकारी कल्पना दिली आहे. मग या हिमखंडापासून पिण्यायोग्य पाणी बनवण्याची कल्पना मांडण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications