पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई; 1500 पेक्षा अधिक संशयितांना घेतले ताब्यात
Pahalgam Terrorist Attack Update News : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधून 1500 हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याबाबत त्यांचा काही संबंध असू शकतो का, यासंदर्भात चौकशी केली जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक दिल्लीत पार पडली. मंगळवारी बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी भेट दिली.

पीटीआय वृत्तानुसार, गृहमंत्र्यांना घटनांचा क्रम आणि घनदाट जंगलांनी वेढलेल्या पर्यटन स्थळी दहशतवादी कोणत्या मार्गांनी पोहोचू शकल असतील, याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी, अमित शाह यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ते पोलिस नियंत्रण कक्षात आयोजित शोकसभेला देखील हजर होते. त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, देश दहशतवादासमोर झुकणार नाही आणि पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्यांना कोणत्याही हालतीत सोडले जाणार नाही.
राजनाथसिंह यांनीही दिला थेट इशारा!
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या एका दिवसानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी एक मोठे विधान केले. सिंह म्हणाले की, दहशतवादी हल्ल्याला योग्य उत्तर दिले जाईल आणि भारत लवकरच कारवाई करेल. संरक्षण मंत्री म्हणाले, 'काल, पहलगाममध्ये धर्माला लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाने अनेक निष्पाप नागरिक गमावले आहेत. या अत्यंत अमानवी कृत्याने आपण दु:खात अडकलो आहे. सर्वप्रथम, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे अशा सर्व कुटुंबांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखद प्रसंगी मी देवाकडे दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करतो.
भारत दहशतवाद्यांना घाबरत नाही
राजनाथ सिंह म्हणाले की, भारत ही इतकी जुनी संस्कृती आहे आणि इतका मोठा देश आहे. अशा कोणत्याही दहशतवादी कारवायांमुळे त्याला घाबरवता येणार नाही. अशा कृत्यांना जबाबदार असलेल्यांना लवकरच उत्तर मिळेल. येथे, मी दहशतवादाविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरण असल्याचा भारताचा निर्धार पुन्हा सांगू इच्छितो. या भ्याड कृत्याविरुद्ध भारतातील प्रत्येक नागरिक एकजूट आहे. मी देशवासीयांना खात्री देतो की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार आवश्यक आणि योग्य असे प्रत्येक पाऊल उचलेल आणि आम्ही केवळ ही घटना घडवून आणणाऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही. ज्यांनी पडद्यामागे बसून भारताच्या भूमीवर असे नापाक कृत्य करण्याचे षड्यंत्र रचले आहे, त्यांचा देखील ठावठिकाणा लावला जाईल.












Click it and Unblock the Notifications