महावीर जयंती 2025 : कोण होते भगवान महावीर? त्यांना ज्ञानप्राप्ती कोठे झाली? राजपाट का सोडला? वाचा
भगवान महावीर यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला झाला. हा दिवस जैन धर्मात महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो. महावीर जयंती हा जैन समाजासाठी एक महत्त्वाचा उत्सव असतो. आज १० एप्रिलला देशभर महावीर जयंती उत्साहात साजरी होत आहे. भगवान महावीर हे २४ वे तीर्थंकर आणि जैन धर्माचे शेवटचे उपदेशक होते. अगदी लहान वयात त्यांनी सन्यास घेतला. आज महावीर जयंतीनिमित्त त्यांचा जीवन परिचय आपण पाहूयात...

स्वप्नात 'तीर्थंकर' होण्याची भविष्यवाणी
भगवान महावीर यांचा जन्म इ.स.पूर्व ५९९ मध्ये बिहार राज्यात झाला. त्यांचा जन्म लिच्छवी वंशातील राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या पोटी झाला. गरोदरपणात त्रिशाला यांना अनेक स्वप्ने पडली होती. तिच्या पोटी जन्मलेले मुल हे तीर्थंकर होईल, असे त्या स्वप्नात दिसले होते. भगवान महावीरांचा जन्म ब्राह्मण ऋषभदेव यांच्या पत्नी देवानंद यांच्या गर्भात झाला होता, परंतु देवांनी तो त्रिशलाच्या गर्भात स्थानांतरित केला.
बालपणीचे नाव होते 'वर्धमान'
असे मानले जाते की जेव्हा भगवान महावीरांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या राज्यात खूप प्रगती आणि समृद्धी होती, म्हणून त्यांचे नाव वर्धमान ठेवण्यात आले. वर्धमान म्हणजे 'वाढणे'. सुरुवातीला महावीर एक राजपुत्र होते पण ते जैन धर्माच्या श्रद्धेकडे आकर्षित झाले आणि त्यांनी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी राजेशाही सुखसोयी आणि कुटुंबाचा त्याग केला आणि सत्याच्या शोधात निघाले.
अहिंसेचा दिला संदेश
२३ वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांना मोक्ष मिळाल्यानंतर १८८ वर्षांनी भगवान महावीर यांचा जन्म झाला. भगवान महावीरांनी संपूर्ण जगाला अहिंसा परम धर्माचा (अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे) संदेश दिला. परिणामी, जैनांनी त्यांच्या श्वासात किंवा तोंडात कीटकांमुळे मृत्यू टाळण्यासाठी तोंडाभोवती स्कार्फ घालण्यास सुरुवात केली. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचे अनुसरण करण्याव्यतिरिक्त, भगवान महावीरांनी पाच महाव्रत, पाच अनुभव्रत, पाच समिती आणि सहा आवश्यक नियमांचा उल्लेख केला आहे जे जैन धर्माचा मुख्य पाया आहेत.
जगा आणि जगू द्या
भगवान महावीरांनी त्यांच्या आयुष्याची पहिली ३० वर्षे राजेशाही जीवनात घालवली. त्यानंतर त्यांनी सर्व काही सोडून दिले आणि जंगलात जाऊन १२ वर्षे तपश्चर्या केली. या दीर्घ तपश्चर्येनंतर त्यांना कैवल्याचे ज्ञान प्राप्त झाले. भगवान महावीर ज्ञानाच्या शोधासाठी अनेक ठिकाणी भटकले. शेवटी ज्ञान हे त्यांना जांबुकमधील एका झाडाखाली सापडले. त्यानंतर त्यांनी जगाला मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला. जगा आणि जगू द्या हा संदेश दिला.












Click it and Unblock the Notifications