कुंभमेळा 2025 संपला : विक्रमी गर्दी, आग, चेंगराचेंगरी, व्हायरल स्टोरी, वाद... वाचा 8 इंटरस्टींग घटना
जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणून ओळखला जाणारा, महाकुंभ मेळा बुधवारी संपला. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शेवटचे शाही स्नान झाले. 'वसुधैव कुटुंबकम' या भावनेने एकत्रित झालेल्या ४५ दिवसांच्या कुंभमेळ्यात ६६ कोटींहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर असलेल्या त्रिवेणी संगमात शाही स्नानाचा लाभ घेतला.

महाकुंभात एकूण सहा 'शाही स्नान' होते. त्यांना अमृतस्नान म्हणूनही ओळखले गेले. मकर संक्रांती (१४ जानेवारी), मौनी अमावस्या (२९ जानेवारी) वसंत पंचमीला (३ फेब्रुवारी), पौष पौर्णिमा (१३ जानेवारी), माघी पौर्णिमा (११-१२ फेब्रुवारी) आणि आजचे महाशिवरात्री असा शाही स्नानांचा मुहूर्त होता. प्रयागराजच्या महाकुंभात भक्ती आणि श्रद्धेने वातावरण असताना काही वेळा वादही निर्माण झाले. चेंगराचेंगरी, आगीच्या दुर्घटनाही या सोहळ्यात पहायला मिळाल्या.
महाकुंभ- २०२५ मधील महत्त्वाच्या घटना
1. महाकुंभात विक्रमी गर्दी
या वर्षीचा महाकुंभ हा तारांकित राहिला. व्हीआयपी व व्हिव्हीआयपींनी यावेळी गर्दी केलेली दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी , राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अखिलेश यादव, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अक्षय कुमार, प्रीती झिंटा, हेमा मालिनी आणि रेमो डिसूझा यासारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत, उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब, गौतम अदानी आणि स्टीव्ह जॉब्सची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांनी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी महाकुंभाला भेट दिली.
2. अनेक गोष्टी झाल्या व्हायरल
मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील सोळा वर्षीय मोनालिसा भोसले ही २०२५ च्या महाकुंभात इंटरनेट सेन्सेशन बनली. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. प्रयागराज येथील महाकुंभ २०२५ मध्ये एका कंटेंट क्रिएटरने तिच्या रुद्राक्षांच्या माळा विकतानाचे चित्रीकरण केले तेव्हा मोनालिसाला पहिल्यांदा प्रसिद्धी मिळाली. तिच्या आकर्षक डोळ्यांनी आणि नैसर्गिक आकर्षणाने सोशल मीडिया वापरकर्त्यांना भुरळ घातली, ज्यामुळे ती व्हायरल झाली.
3. आयआयटी बाबा झाले व्हायरल
महाकुंभात आलेले आयआयटी बाबा अभय सिंग यांची मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली. रणवीर अलाहाबादिया वाद आणि भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याच्या अयशस्वी भाकितांवर त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते सतत बातम्यांमध्ये राहिले.
4. डिजीटल स्नानही आले चर्चेत
महाकुंभात व्हायरल झालेल्या व्हिडीओत एका स्थानिक उद्योजकाचाही समावेश होता. ज्याने दूरवरच्या भाविकांना प्रतिकात्मकपणे सहभागी होण्यासाठी 'डिजिटल स्नान'ची एक अनोखी सेवा तयार केली होती. प्रति व्यक्ती १,१०० या दराने जो व्यक्ती महाकुंभात प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकला नाही, त्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो त्यांने त्रिवेणी संगमात वाहते केले.
5. चेंगराचेंगरी
२९ जानेवारी रोजी दुसऱ्या अमृत स्नानात गोंधळ उडाला. याच गोंधळात चेंगराचेंगरीची दुःखद घटना घडली. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 'मौनी अमावस्ये'च्या दिवशी हजारो भाविक गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी जमले होते त्या दिवशी महाकुंभ दरम्यान संगम तीरावर चेंगराचेंगरी झाली. २९ जानेवारी रोजी पहाटे १ ते २ दरम्यान घडलेल्या या घटनेत किमान ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. त्यानंतर २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पुन्हा चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यात १४ महिलांसह १८ जणांचा मृत्यू झाला.
6. आगीच्या घटनाही गाजल्या
याशिवाय कुंभमेळ्यात जवळपास अर्धा डझन आगीच्या घटना घडल्या. मात्र त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहिली आग लागली तेव्हा गॅस टाक्यांचा स्फोट झाल्याचे सांगितले गेले. त्यावेळी गीता प्रेसच्या अनेक साहित्याचे त्यात नुकसान झाले. त्यानंतर मात्र महाकुंभाच्या ४५ दिवसांत इतरही पाच आगीच्या घटना घडल्या. त्यात जिवितहानी झाली नसली तरी, वित्तहानी मात्र भरपूर झाली.
7. ममता बॅनर्जींचा आरोप
राजकारण्यांमध्येही महाकुंभ चर्चेचा विषय होता. २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान चेंगराचेंगरीची घटना संसदेत पोहोचली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चेंगराचेंगरीच्या घटनांमुळे महाकुंभाला "मृत्यू कुंभ" असे संबोधून वाद निर्माण केला. १४४ वर्षांनी महाकुंभ होत असल्याचा दावा खोटा असल्याचेही बॅनर्जी म्हणाल्या. महाकुंभ मेळ्याच्या तयारी आणि व्यवस्थापनावर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारवर अनेक विरोधी नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारवर चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या लपवल्याचा आरोप केला. माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनीही महाकुंभला 'फालतू' असे नाव दिल्याने वाद निर्माण झाला.
8. स्वच्छतेबद्दलचे वाद
'दिव्य कुंभ, भव्य कुंभ, सुरक्षित कुंभ' अशी टॅगलाइन असलेल्या या कुंभमेळ्याला सुरक्षा आणि स्वच्छतेचे एक उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जात असे. सुरक्षा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसर सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक शिफ्टमध्ये दिवसरात्र काम केले. तथापि, ज्योतिषी आणि युट्यूबर निधी चौधरी यांनी त्रिवेणी संगम मानवी मलमूत्राने दूषित झाल्याचा आरोप केला. शोशल मिडीयाचे चित्रिकरण करताना आपल्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोपही तिने केला होता.












Click it and Unblock the Notifications