कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार! PM मोदी, शहांची CM योगींशी चर्चा
Maha kumbh 2025 stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बुधवारी महाकुंभ दरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभात स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी संगमावर पोहोचली होती. यावेळी संगममध्ये गोंधळ आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला. दरम्यान या घटेननंतर परिस्थितीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली.
या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येला अमृतस्नान हा महाकुंभातील सर्वात महत्वाचा विधी मानला जातो. 144 वर्षांनंतर दुर्मिळ 'त्रिवेणी योग' जुळून आल्याने हा दिवस आणखी खास होता. त्यामुळे कुंभात सुमारे 10 कोटी भाविक सहभागी झाल्याचा अंदाज आहे.

काय म्हणतोय प्रत्यक्षदर्शी?
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आंघोळीनंतर बाहेर पडताना चेंगराचेंगरी झाली. काही लोक वाटेत पडलेल्या लोखंडी डस्टबीनवर आदळले, त्यामुळे ते पडले आणि त्यांच्यासोबत इतरही पडले. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, चेंगराचेंगरीचा प्रत्यक्षदर्शी विवेक मिश्रा यांनी सांगितले की, गर्दीला आंघोळ केल्यानंतर कुठे जायचे हे समजत नव्हते. ठिकठिकाणी ठेवलेले लोखंडी डस्टबीनही भाविकांना दिसत नव्हते, त्यामुळे अनेक भाविक पडून त्यांच्या बॅगा व इतर सामान इकडे-तिकडे विखुरले.
मी स्वःत अन् आई-वडीलही पडले
प्रत्यक्षदर्शीने सांगितले, "मी स्वतः पडलो आणि माझा पाय दुखावला. माझे आई-वडीलही पडले, त्यांना मी मदत केली. मी दुसऱ्या महिलेलाही उचलले. पण त्यानंतर जमावातील काही तरुण घाबरून एकमेकांना धक्काबुक्की करू लागले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
चेंगराचेंगरीचे मुख्य कारण काय होते?
फतेहपूरहून आलेले राम सिंह म्हणाले, "बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली," तो म्हणाला, "आम्ही चार जण होतो, आमचे काही मित्र आधीच नंदनी द्वारला पोहोचले होते." आम्ही मागे राहिलो आणि अचानक रस्ता पूर्णपणे बंद झाला. समोर लोकं पडत होती आणि मागूनही गर्दी वाढत होती. त्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली." बलियाचे बलजीत सिंग म्हणाले, "अचानक एवढी गर्दी झाली की लोक एकमेकांवर तुटून पडले. आम्ही 14 जण एकत्र आलो होतो, पण चेंगराचेंगरीत कोण गेले हे कोणालाच समजले नाही."
अधिकारीस्तरावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान 15 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत, परंतु प्रशासनाने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पहाटे अडीच वाजता हा प्रकार घडला असून, घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 13 आखाड्यांनी मौनी अमावस्येला स्नान रद्द केले आहे.












Click it and Unblock the Notifications