कोलकाता पुन्हा हादरलं:लॉ कॉलेजच्या परिसरात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
कोलकात्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण कोलकात्यातील कासबा भागात असलेल्या एका लॉ कॉलेजच्या परिसरात एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना २५ जून रोजी संध्याकाळी घडली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी माजी विद्यार्थी व दोन कॉलेज कर्मचाऱ्यांसह तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मनोजीत मिश्रा (३१), जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखोपाध्याय (२०) यांचा समावेश आहे. यापैकी मनोजीत मिश्रा हा माजी विद्यार्थी असून, तो तृणमूल विद्यार्थी परिषदेचा सदस्य असल्याचीही चर्चा आहे. जैब आणि प्रमित हे कॉलेजमध्ये सहाय्यक कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
कशी घडली घटना?
पीडित विद्यार्थिनीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २५ जून रोजी संध्याकाळी ७:३० वाजल्याच्या सुमारास आरोपींनी तिला कॉलेज परिसरात बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर २६ जून रोजी रात्री तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली, तर तिसऱ्या आरोपीला २७ जून रोजी त्याच्या घरी अटक करण्यात आली.
पीडितेची वैद्यकीय तपासणी चित्तरंजन नॅशनल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये करण्यात आली असून, सर्व आरोपींच्या मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तिघांना शुक्रवारी अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
राजकीय घमासान सुरू
या घटनेनंतर राज्यात राजकीय वादळ उठले आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी टीएमसीवर टीका करत म्हटले, "या राज्यात महिलांच्या सुरक्षेची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. मुख्यमंत्री या घटनेलाही 'लहान घटना' म्हणत दुर्लक्ष करतील." भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी X वर पोस्ट करत टीएमसीच्या सदस्याच्या सहभागाचा आरोप केला.
दरम्यान, टीएमसी प्रवक्ते जयप्रकाश मजूमदार यांनी भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देत म्हटले, "या प्रकारच्या सामाजिक विकृतींचा सामना एकत्र येऊन करायला हवा, राजकारण करून नव्हे."
आरजी कर प्रकरणानंतर दुसरी मोठी घटना
याच राज्यात गेल्या वर्षी आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये पीजी विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेने संपूर्ण देशभर संताप उसळवला होता. आता पुन्हा एकदा एका शिक्षण संस्थेत अशा प्रकारची घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेच्या बाबत राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
कोर्टात दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष मानले जातात. मात्र, घटनेची गंभीरता लक्षात घेता राज्य प्रशासन आणि पोलिसांकडून तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. शिक्षण संस्था आणि महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.












Click it and Unblock the Notifications