आई, मी चोरी केली नाही, चिप्स चोरीच्या आरोपानंतर चिमुकल्याचं टोकाचं पाऊल; सुन्न करणारं शेवटचं पत्र..
कधी कधी समाजाच्या नजरेतून काही गोष्टी सुटतात आणि एका कोवळ्या जीवाचा अंत होतो. पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात घडलेली ही घटना प्रत्येकाच्या काळजाला चटका लावणारी आहे.

अवघ्या १३ वर्षांचा कृष्णेंदु दास नावाचा एक मुलगा, जो अजून आयुष्य समजूनही घेत नव्हता, त्याच्यावर चिप्सचे पाकीट चोरल्याचा खोटा आरोप करण्यात आला. त्या अपमानाने त्याच्या कोवळ्या मनावर इतका परिणाम झाला की त्याने स्वतःच आयुष्य संपवलं
एक चूक नव्हती, पण शिक्षा झाली
रविवारी, कृष्णेंदु बाजारात गेला होता. चिप्स खरेदी करण्याची लहानशी इच्छा त्याने आईजवळ सांगितली होती. पण ज्याचं बालपण नुकतंच उमलायला लागलं होतं, त्या मुलाचं नशीबच वाईट निघालं.
चिप्सची दुकाने बंद होती, विक्रेता नव्हता. रस्त्यावर पडलेलं एक चिप्सचं पाकीट त्याच्या नजरेस पडलं, आणि निरागसपणे त्याने ते उचलून घरी चालायला सुरुवात केली. पण इथेच काळाने वेगळं वळण घेतलं...
सार्वजनिक अपमान, लहानशा जीवाचं मन तुटलं
स्थानिक सिविक वालंटियर शुभंकर आणि दुकान मालकाने त्याचा पाठलाग करून त्याला थांबवलं. त्याच्यावर चोरीचा आरोप करत, सर्वांसमोर त्याच्यावर कान पकडून उठाबशा करायला लावल्या, आणि बेदम मारहाण केली.
कृष्णेंदु रडत रडत सांगत होता - "मी चोर नाही... मी ते फक्त उचललं..."
पण कुणाचं मन द्रवेल इतकी संवेदनशीलता समाजात राहिली नव्हती.
"आई, मी चोरी केली नाही", शेवटची चिठ्ठी
आईने घडलेलं पाहिलं. घाबरलेली, असहाय्य. ती त्याला घरी घेऊन आली. कृष्णेंदु काही न बोलता आपल्या खोलीत गेला. थोड्याच वेळात, आईने जे पाहिलं ते एका आईसाठी आयुष्यभराचं दुःख होतं. कृष्णेंदु बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता.
त्याने घरात ठेवलेले कीटकनाशक प्यायलं होतं. रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर गुरुवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
त्याच्या खोलीत सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं की,
"आई, मी चोरी केली नाही. ते पाकीट रस्त्यावर होतं. मला वाईट वाटलं. लोक हसले... मारलं... पण मी खरंच चोर नव्हतो..."
हे शब्द फक्त एका मुलाचं शेवटचं पत्र नाही - ते समाजाच्या विवेकाला दाखवलेला आरसा आहे.
लोकांचं संतप्त आंदोलन आणि न्यायाची मागणी
ही घटना समजताच स्थानिक जनतेमध्ये संताप उसळला. शुभंकर या सिविक वालंटियरवर तत्काळ अटकेची मागणी केली जात आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. पण आरोपी अद्याप मोकळाच आहे, हे दुर्दैवी आहे.
एक मुलगा गेला, पण एक समाज हरला
कृष्णेंदु गेला. पण सोबत नेलं एक भाकरीवर जगणाऱ्या कुटुंबाचं आनंदी भविष्य, एक आईचा आधार, आणि आपल्या निरागसपणावर ठाम विश्वास ठेवणारा एक बालक.
आज आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवं -
एवढा निर्दोष मुलगा आपण का गमावला?
चूक न करता शिक्षा झाली, हा कुठल्या न्यायाचा भाग आहे?
कृष्णेंदु आज नाही, पण त्याच्या शेवटच्या शब्दांनी आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात दया, समजूत आणि माणुसकीचा प्रकाश जागवायला हवा.












Click it and Unblock the Notifications