उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, काय आहे कारण?
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आरोग्यविषयक कारणे आणि वैद्यकीय सल्ल्याचा हवाला देत, संविधान कलम ६७ (अ) अंतर्गत आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला.

राजीनामा पत्रातील मजकूर
राष्ट्रपती मुर्मू यांना उद्देशून लिहिलेल्या आपल्या पत्रात जगदीप धनखड यांनी म्हटले आहे की, "आरोग्याला प्राधान्य देत आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करत, मी भारताच्या उपराष्ट्रपती पदावरून तात्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे." त्यांनी राष्ट्रपतींचे त्यांच्या सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांसाठी आभार मानले. तसेच, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचेही त्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनासाठी आभार व्यक्त केले.
धनखड यांनी आपल्या राजीनामा पत्रात पुढे लिहिले, "संसदेच्या सर्व माननीय सदस्यांकडून मला मिळालेले प्रेम, विश्वास आणि सन्मान आयुष्यभर माझ्या हृदयात जपलेले राहील." उपराष्ट्रपती म्हणून आपला कार्यकाळ आठवताना ते म्हणाले, "या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेले अनुभव आणि दृष्टीकोनांसाठी मी अत्यंत आभारी आहे. भारताच्या आर्थिक विकासाचा आणि अभूतपूर्व परिवर्तनाच्या काळात साक्षीदार होणे हे माझ्यासाठी भाग्य आणि समाधानाची बाब राहिली आहे." भारताच्या जागतिक उदयावर आणि उज्ज्वल भविष्यावर अटूट विश्वास व्यक्त करत त्यांनी आपल्या राजीनामा पत्राचा समारोप केला.
जगदीप धनखड यांचा प्रवास
जगदीप धनखड यांनी २०२२ मध्ये भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. ६ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत त्यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता. जगदीप धनखड यांना एकूण ७२५ पैकी ५२८ मते मिळाली होती, तर मार्गारेट अल्वा यांना १८२ मते मिळाली होती.
उपराष्ट्रपती होण्यापूर्वी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे, १९५१ रोजी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातील शाळेतूनच पूर्ण केले. त्यानंतर शिष्यवृत्ती मिळवून ते चित्तोडगड सैनिक शाळेत शिकायला गेले. धनखड यांची निवड नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये झाली होती, परंतु तेथे ते गेले नाहीत.
त्यांनी जयपूरच्या महाराजा कॉलेजमधून बीएससी (ऑनर्स) ची पदवी घेतली. राजस्थान युनिव्हर्सिटीमधून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जयपूरमध्येच वकिली सुरू केली आणि राजस्थान उच्च न्यायालयातील एक नामांकित वकील म्हणून ओळख मिळवली. धनखड यांनी १९७९ मध्ये राजस्थान बार कौन्सिलची सदस्यता घेतली. २७ मार्च, १९९० रोजी ते राजस्थान उच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता बनले. त्याच वेळी ते सर्वोच्च न्यायालयातही वकिली करत होते. १९८७ मध्ये त्यांची राजस्थान हायकोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदीही निवड झाली होती.












Click it and Unblock the Notifications