असीम मुनीरांच्या न्यूक्लियर धमकीला भारताचे जशास तसे प्रत्युत्तर; USचा पाठिंबा अन् बेजबाबदार देश!
पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानच्या आर्मीच्या मदतीने दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. त्यातच आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून भारताला अण्वस्त्रांची धमकी दिल्यानंतर भारताने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय सरकारी सूत्रांनी पाकिस्तानला "अण्वस्त्रे असलेला बेजबाबदार देश" असे संबोधले आहे.
पाकिस्तानची धमकी आणि भारताची प्रतिक्रिया
असीम मुनीर यांनी अमेरिकेत भाषण देताना सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांवर भारत बांधत असलेली धरणे क्षेपणास्त्रांनी उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यांच्या या विधानावर भारताने सडेतोड उत्तर दिले आहे.
भारतीय सरकारी सूत्रांनुसार, जेव्हा जेव्हा पाकिस्तानला अमेरिकेचा पाठिंबा मिळतो, तेव्हा ते अशी अण्वस्त्रे वापरण्याची धमकी देतात. ही पाकिस्तानची जुनी सवय आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने असीम मुनीर यांच्या विधानांना स्पष्टपणे नकार देत कठोर भूमिका घेतली आहे. भारताने हे स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही प्रकारच्या आण्विक ब्लॅकमेलला बळी पडणार नाही आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. ही परिस्थिती भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकशाही सुरक्षेला आव्हान म्हणून उदयास आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की पाकिस्तानकडून आण्विक दहशत पसरवणारी अशी विधाने चिंतेचा विषय आहेत. ते म्हणाले की पाकिस्तानमधील लष्कर आणि दहशतवादी गटांमधील जवळचे संबंध अण्विक कमांड आणि नियंत्रणाच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतात.
अमेरिकेवरही जोरदार निशाणा
एका मित्र राष्ट्राच्या भूमीवर अशा बेजबाबदार गोष्टी बोलल्या गेल्या हे अत्यंत दुर्दैवी आहे. भारताने आधीच स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही आण्विक ब्लॅकमेलला बळी पडणार नाही आणि त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.

पाकिस्तान बेजबाबदार देश
सूत्रांनी असेही म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये लोकशाहीचा अभाव असून तेथील सर्व गोष्टींवर लष्कराचे नियंत्रण आहे. पाकिस्तानमधील अण्वस्त्रे राज्याबाहेरील घटकांच्या (non-state actors) हाती पडण्याचा खरा धोका आहे, असा इशारा भारताने दिला आहे.
दहशतवादी गटांशी लष्कराचे संगनमत
परराष्ट्र मंत्रालयानेही मुनीर यांच्या विधानाचा निषेध केला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्या देशाचे लष्कर दहशतवादी गटांशी संगनमत करत आहे, त्या देशाच्या अण्वस्त्र कमांड आणि नियंत्रणाच्या विश्वासार्हतेबद्दल आधीच असलेल्या शंका या विधानांमुळे अधिक बळकट होतात.
भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम
भारताने असा आरोप केला आहे की, असीम मुनीर यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याला चिथावणी देणारे भाषण दिले होते. मुनीर यांची अण्वस्त्र धमकी अशा वेळी आली आहे, जेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील व्यापार धोरणांमुळे नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील संबंध ताणले गेले आहेत. ट्रम्प यांनी १९ जून रोजीच मुनीर यांचे स्वागत केले होते, ज्यामुळे या घटनेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.












Click it and Unblock the Notifications