संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत 'इंडिया' आघाडीचा विराट मोर्चा, ३०० हून अधिक खासदार एकवटले
देशात 'मतचोरी' आणि मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर 'इंडिया' आघाडीच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या ३०० हून अधिक खासदारांनी आज दिल्लीत जोरदार निदर्शने केली. संसदेच्या मकरद्वारापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता.

नेमके काय घडले?
राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत मतदार यादीतील अनियमिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आज याच मुद्द्यावर 'इंडिया' आघाडीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. या मोर्चात राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते. हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी तो मध्यभागी अडवला.
पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्समुळे पुढे जाणे अशक्य झाले. काही खासदारांनी बॅरिकेड्सवरून उड्या मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, ज्यात अखिलेश यादव, सागरिका घोष आणि महुआ मोईत्रा यांचाही समावेश होता. मात्र, पोलिसांनी अनेक खासदारांना ताब्यात घेतले. या निदर्शनांदरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृतीही बिघडल्याचे वृत्त आहे.
विरोधी पक्षांची मागणी आणि निवडणूक आयोगाचे निमंत्रण
मोर्चा काढण्यापूर्वी निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या ३० सदस्यीय शिष्टमंडळाला चर्चेसाठी दुपारी १२ वाजता बोलावले होते. मात्र, 'इंडिया' आघाडीने हे निमंत्रण स्वीकारण्यास नकार दिला. जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाच्या पत्राला उत्तर देताना सांगितले, "आम्ही शिष्टमंडळ म्हणून नव्हे, तर सर्व खासदार मिळून निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आम्ही फक्त ३० जण नव्हे, तर सर्वजण एकत्रच निवडणूक आयोगाकडे जाऊ."
अखिलेश यादव यांनीही पोलिसांच्या अडवणुकीवर नाराजी व्यक्त करत, "पोलिसांनी आम्हाला जाऊ दिले तर आम्ही जाऊ, पण ते आम्हाला अडवत आहेत," असे म्हटले. सध्या शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक खासदार तिथेच ठिय्या देऊन बसले आहेत.
'मतचोरी'चा मुद्दा आणि पुढील रणनीती
राहुल गांधी यांनी कालच 'मतचोरी' विरोधात एक मोहीम सुरू केली असून एक वेबसाइट देखील लाँच केली आहे. त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. मतदार यादीतील गोंधळावरून आणि गैरव्यवहारांवरून विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. आजच्या मोर्चातून विरोधकांनी आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.












Click it and Unblock the Notifications