इराणमधील भारतीयांना देश सोडण्याचे आदेश! भारत सरकारचा मोठा इशारा; 'या' मार्गाने होणार मायदेशी सुटका
India advisory for Iran : पश्चिम आशियातील तणाव आणि इराणमध्ये वाढलेली अंतर्गत अस्थिरता पाहता, भारत सरकारने तेथे वास्तव्यास असलेल्या आपल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' (Salami Advisory) जारी केला आहे. इराणमधील बिघडत चाललेली सुरक्षा व्यवस्था आणि हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीयांना "शक्य तितक्या लवकर" इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे.

परिस्थिती हाताबाहेर: निदर्शनांचे क्रांतीत रूपांतर
गेल्या महिन्यात इराणच्या चलनाचे (रियाल) मूल्य घसरल्यामुळे सुरू झालेली निदर्शने आता ३१ प्रांतांमध्ये पसरली आहेत. याचे रूपांतर आता एका मोठ्या राजकीय क्रांतीत झाले असून, संपूर्ण देशात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षा परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करत भारत सरकारने आपल्या नागरिकांना सतर्क केले आहे.
इराणमधून बाहेर पडण्यासाठी सरकारचे दोन प्रमुख 'प्लॅन्स'
परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दोन महत्त्वाचे मार्ग सुचवले आहेत.
१. तात्काळ परतीसाठी व्यावसायिक उड्डाणे
सध्या इराणमधील प्रमुख शहरांतून विमान सेवा सुरू आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी परिस्थिती आणखी बिघडण्याची वाट न पाहता व्यावसायिक उड्डाणांची (Commercial Flights) तिकिटे त्वरित बुक करावीत. तेहरानसारख्या प्रमुख शहरांमधील विमानतळांवरून सध्या बाहेर पडणे सोपे आहे. नजीकच्या भविष्यात इराणचे हवाई क्षेत्र (Airspace) बंद होण्याची शक्यता असल्याने, विलंब टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२. आपत्कालीन परिस्थितीसाठी 'आर्मेनिया' मार्ग (बॅकअप प्लॅन)
जर भविष्यात हवाई क्षेत्र बंद झाले किंवा विमान सेवा विस्कळीत झाली, तर सरकारने एक पर्यायी धोरणात्मक मार्ग तयार ठेवला आहे.
येरेवन (आर्मेनिया) ट्रान्झिट: भारतीयांना रस्ते मार्ग किंवा विशेष विमानाने प्रथम शेजारील देश आर्मेनियाची राजधानी येरेवन येथे आणले जाईल.
दोहामार्गे दिल्ली : येरेवनहून नागरिकांना कतारमधील दोहा या ट्रान्झिट हबमध्ये नेले जाईल आणि तेथून कनेक्टिंग फ्लाईट्सने नवी दिल्लीच्या IGI विमानतळावर सुरक्षित आणले जाईल.
काश्मिरी विद्यार्थी आणि कामगारांची चिंता
इराणमध्ये मोठ्या संख्येने काश्मिरी विद्यार्थी वैद्यकीय आणि इतर शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. तसेच अनेक भारतीय तिथे रोजगारासाठी आहेत. या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात आहे. "स्वतःहून बाहेर पडणे हा सध्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे," असे सरकारने अधोरेखित केले आहे.












Click it and Unblock the Notifications