Holi 2026 Date: कधी आहे होळीचा सण, चंद्रग्रहणामुळे तारखेचा उडाला गोंधळ; जाणून घ्या सुतक काळ अन् वेळ
Holi 2026 date : रंगांचा सण होळी आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, 2026 ची होळी खगोलशास्त्रीय आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत विशेष ठरणार आहे. यावर्षी होळीच्या काळात वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार असल्याने, धूलिवंदन (रंग खेळण्याची होळी) नेमकी कधी साजरी करायची, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम आहे. चला या लेखातून समजून घेऊया की होळीचे महत्त्व व त्याची विशेष तिथी!

होळी २०२६ च्या महत्त्वाच्या तारखा
यावर्षी ग्रहणामुळे होळी सणाच्या नियोजनात बदल करण्यात आलेला आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण असल्याने या सणामध्ये देखील काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे.
- होलिका दहन: २ मार्च २०२६ (सोमवार)
- चंद्रग्रहण: ३ मार्च २०२६ (मंगळवार)
- धूलिवंदन (रंगांची होळी): ४ मार्च २०२६ (बुधवार)
सामान्यतः होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. परंतु, 3 मार्चला ग्रहण आणि त्याचा सुतक काळ असल्याने, यंदा रंगोत्सव 4 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.
चंद्रग्रहण 2026 : वेळ आणि सुतक काळ
2026 मधील हे पहिले आणि सर्वात मोठे चंद्रग्रहण मानले जात आहे. विशेष म्हणजे हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचे धार्मिक नियम (सुतक) पाळणे आवश्यक आहे.
ग्रहणाची वेळ : 3 मार्च रोजी दुपारी 3:20 वाजता ग्रहणाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 6:47 वाजता ते समाप्त होईल.
भारतात दर्शन : भारतात हे ग्रहण सुमारे 25 मिनिटे उघड्या डोळ्यांनी पाहता येईल.
सुतक काळ : चंद्रग्रहणाचे सुतक 9 तास आधी सुरू होते. त्यानुसार, 3 मार्च रोजी सकाळी 6:20 वाजता सुतक काळ सुरू होईल.
सुतक काळात काय टाळावे?
शास्त्रानुसार सुतक काळात शुभ कार्ये केली जात नाहीत. देवमूर्तींना स्पर्श करणे, भोजन करणे, स्वयंपाक करणे किंवा केस-नखे कापणे या गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. यामुळेच 3 मार्चला होळी न खेळता ती 4 मार्चला साजरी केली जाईल.
होळीचे महत्त्व आणि पौराणिक कथा
होळी हा सण केवळ रंगांची उधळण नसून तो 'वाईटावर चांगल्याच्या विजयाचे' प्रतीक आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा उत्सव साजरा केला जातो.
भक्त प्रल्हाद आणि होलिका दहन
ही कथा असुर राजा हिरण्यकशिपू आणि त्याचा विष्णूभक्त मुलगा प्रल्हाद यांच्याभोवती फिरते. प्रल्हादाची भक्ती नष्ट करण्यासाठी हिरण्यकशिपूने आपली बहीण 'होलिका' (जिला अग्नीचे वरदान होते) हिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून चितेवर ठेवले. मात्र, प्रल्हादाच्या अढळ श्रद्धेमुळे तो सुरक्षित राहिला आणि वरदान असूनही होलिका जळून राख झाली. या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी 'होलिका दहन' केले जाते.
सांस्कृतिक वारसा
होळीच्या निमित्ताने मथुरा आणि वृंदावनमधील सोहळे जगप्रसिद्ध असतात. महाराष्ट्रातही घराघरात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तर उत्तर भारतात गुझिया आणि मालपुआ सारख्या पदार्थांची रेलचेल असते. लोकगीते आणि नृत्यांच्या माध्यमातून सामाजिक बंधुत्व जोपासले जाते.












Click it and Unblock the Notifications