‘गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणत आहेत'; गुणरत्न सदावर्तेंचा मराठा आंदोलकांवर गंभीर आरोप
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. "आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या घेऊन येत आहेत," असा सनसनाटी दावा त्यांनी न्यायालयात केला.

'माझ्या मुलीला शाळेत जायचं आहे, पोलीस असहाय्य आहेत'
अॅड. सदावर्ते यांनी न्यायालयाला सांगितले की, "माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचे आहे, पण मराठा आंदोलकांसमोर पोलीस असहाय्य (helpless) झाले आहेत." आंदोलकांना बाहेरून येण्यास परवानगी देऊ नये, असा युक्तिवाद मराठा आंदोलकांच्या वकिलांनी केला होता. त्यावर प्रतिवाद करताना सदावर्ते म्हणाले की, "हे लोक फक्त जेवणाचे साहित्य घेऊन येत नाहीत, तर गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत आहेत."
'मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सगळं सुरू आहे'
सदावर्ते यांनी या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही केला. "आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सर्व सुरू आहे," असे विधान त्यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात तातडीने सुनावणी व्हावी यासाठी सोमवारी सुट्टी असतानाही मुंबई उच्च न्यायालयाने ही सुनावणी घेतली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.
'दक्षिण मुंबईतील आंदोलकांना तात्काळ हटवा'
अॅड. सदावर्ते यांनी न्यायालयाला विनंती केली की, "सरकार हे आंदोलनकर्त्यांना हटवू शकत नाही, त्यामुळे न्यायालयानेच त्यांना हटवण्याचे आदेश द्यावेत." त्यांनी आरोप केला की, मराठा आंदोलकांनी संपूर्ण मुंबई रोखून धरली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने मराठा आंदोलकांना दक्षिण मुंबईतून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटनसह दक्षिण मुंबईतील आंदोलकांना तात्काळ हटवण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच, बाहेरून मुंबईकडे येणाऱ्या आंदोलकांना थांबवण्याचे निर्देशही दिले आहेत.
राजकीय हस्तक्षेप आणि परवानग्यांचा वाद
सदावर्ते यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, "आंदोलनाला काही अटींवर परवानगी दिली होती, पण आता संपूर्ण दक्षिण मुंबईत रास्ता रोको सुरू आहे." ते म्हणाले की, "हे सर्व आरक्षणाच्या राजकारणासाठी केले जात आहे आणि यामागे थेट राजकीय हस्तक्षेप आहे." त्यांनी आरोप केला की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) हे आंदोलनकर्त्यांना ट्रकमधून साहित्य पुरवत आहेत.
राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, मनोज जरांगे पाटील यांना फक्त एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी होती. त्यावर आंदोलकांच्या वकिलांनी सरकारकडून नंतरही परवानगी मिळाली होती, असा दावा केला. या दोन्ही बाबींवर न्यायालयात पुढील सुनावणीत चर्चा होणार आहे.
या गंभीर आरोपांमुळे मराठा आंदोलनाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदावर्ते यांच्या आरोपांवर जरांगे पाटील किंवा त्यांच्या समर्थकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या आरोपांमुळे आंदोलनावर काय परिणाम होईल आणि न्यायालय यावर काय निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications