गुजरातमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर, 29 जणांचा मृत्यू, पीएम मोदींचा मुख्यमंत्र्यांना फोन
गुजरातच्या अनेक भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे हजारों लोकांना फटका बसला असून आतापर्यंत वेगवेगळ्या घटनांत 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने आज गुजरातच्या अनेक भागांत रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार सौराष्ट्र आणि कच्छ येथे दबाव वाढण्याची शक्यता आहे.
ते ईशान्य समुद्राकडे सरकत आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये 29 जणांना जीव गमवावा लागला आहे.
भारतीय हवामान विभागाने कच्छ, देवभूमी द्वारका, जामनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, राजकोट, पोरबंदर, जुनागढ, गीर सोमनाथ, अमरेली, भावनगर आणि बोटाडसह 12 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

बुधवारी देवभूमी द्वारका आणि जामनगर या जिल्ह्यांमध्ये 12 तासांत 50 मिमी ते 200 मिमी पाऊस झाला. या कालावधीत देवभूमी द्वारका येथील भानवड तालुक्यात सर्वाधिक 185 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री पटेल म्हणाले, "पंतप्रधानांनी नागरिकांच्या जीवित आणि पशुधनाच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. तसेच गुजरातला केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे."
यासोबतच मुख्यमंत्री पटेल यांनी अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या वडोदरा शहर, देवभूमी द्वारका आणि जामनगर जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. पाण्यात अडकलेल्या लोकांसाठी मदतकार्याला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
पुराचे पाणी कमी होईपर्यंत अडकलेल्या लोकांना अन्नाची पाकिटे, पिण्याच्या पाण्याचे पाऊच आणि आरोग्य औषधे देण्यास राज्य सरकारचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.












Click it and Unblock the Notifications