'तू मेरा शौक देख मेरा इंतजार देख' माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची गाजलेली भाषणं
Manmohan Singh: डॉ. मनमोहन सिंग तसे शांत आणि विनम्र. मात्र जेव्हा ते बोलत असे तेव्हा त्यांची विधानं वृत्तपत्रांच्या हेडलाईनचा विषय व्हायची. आपण आज मनमोहन सिंग यांच्या अशाच काही विधानांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या विधानांची भरपूर चर्चा झाली.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर रोजी निधन झालं. 26 डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं. काही काळानंतर त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आली.

92 वर्षीय मनमोहन सिंग 2004 ते 2014 या काळात सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधान होते. यापूर्वी अर्थमंत्री म्हणून त्यांनी 1991 मध्ये उदारीकरण सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मनमोहन सिंग नम्र होते. पण जेव्हा जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांची विधाने हेडलाइन बनत असत. त्यापैकी काहींबद्दल जाणून घेऊया.
जानेवारी 2014: इतिहास माझ्याप्रती अधिक दयाळू असेल
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांचा दुसरा आणि शेवटचा कार्यकाळ संपण्याच्या सुमारे ६ महिने आधी पत्रकार परिषद घेतली होती. तारीख होती 3 जानेवारी 2014. त्यावेळी मनमोहन सिंग सरकारच्या दुसऱ्या टर्मबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. भ्रष्टाचारापासून घोटाळ्यांपर्यंत अनेक आरोप झाले. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या ट्रॅक रेकॉर्डवर निर्माण झालेल्या प्रश्नांची बाजू मांडली. या पत्रकार परिषदेत डॉ. मनमोहन सिंगांना एक प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर नियंत्रण ठेवू शकला नाहीत असा प्रश्न एका पत्रकाराने डॉक्टरांना विचारला. त्यावर मनमोहन सिंग म्हणाले की,
"माझा विश्वास आहे की मीडिया किंवा संसदेत असणाऱ्या सध्याच्या विरोधकांपेक्षा इतिहास माझ्याप्रती अधिक दयाळू असेल. मंत्रिमंडळात काय होते हे मी तुम्हाला संपूर्णपणे सांगू शकत नाही. काही राजकीय बंधनं असतात आणि ते लक्षात घेऊन मी सर्वोत्तम काम केले आहे. मी परिस्थितीनुसार शक्य तितकं सर्वोत्तम केलं आहे. मी काय केलं किंवा काय केलं नाही हे ठरवणं आता इतिहासाचं काम असल्याच मनमोहन सिंग तेव्हा म्हणाले होते.
ऑगस्ट, 2012: हजार जवाबों से अच्छी है मेरी खामोशी
मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात विरोधक कोळसा वाटपात अनियमिततेचा आरोप करत होते. मनमोहन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक सातत्याने करत होते. यावेळी मनमोहन सिंग यांनी कोळसा खाण वाटपाबाबतचे आरोप वस्तुस्थितीच्या पलीकडे असल्याचं जाहीर केलं. लोकसभेत स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांनी संसद भवनाबाहेर माध्यमांनाशीही संवाद साधला. मनमोहन सिंग यांना मौनी म्हणून टोमणा मारणाऱ्या विरोधकांना त्यांनी एका खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले,
हजार जवाबों से अच्छी मेरी खामोशी, ना जाने कितने सवालों की आबरू रखी."
मार्च, 2011: माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं...
मनमोहन सिंग हे अनेकदा त्यांच्या संयमित भाषणांसाठी ओळखले जातात. त्यांनी अनेक प्रसंगी कवितेचा वापर करून आपले विचार मांडले आहेत. अशीच एक संधी 23 मार्च 2011 रोजी आली. लोकसभेत संसदेच्या कामकाजादरम्यान भाजपच्या वतीने दिवंगत सुषमा स्वराज यांनी शायरीचा संदर्भ देत सरकारवर जोरदार हल्ला केला. त्या म्हणाल्या, "तू इधर-उधर की ना बात कर, ये बता कि काफिला क्यों लुटा, हमें रहजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का सवाल है."
सुषमा स्वराजांच्या या शायरीला मनमोहन सिंग यांनीही खास शैलीत उत्तर दिलं. ते म्हणाले, "माना कि तेरे दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक देख, मेरा इंतजार देख."
डॉक्टर साहेबांच्या या उत्तराने अवघं सभागृह खळखळून हसलं. एव्हाना विरोधकही आपलं हसू रोखू शकले नाहीत. मनमोहन सिंगाच हे भाषण आजही लोक आवर्जून बघतात.
तर असे होते डॉ. मनमोहन सिंग. आज द ग्रेट मनमोहन सिंग आपल्यात नाहीत. पण त्यांच्या अशा अनेक आठवणी आपल्यासोबत कायम राहतील.












Click it and Unblock the Notifications