शिंदेंच्या लोकप्रियतेवर पुन्हा शिक्कामोर्तब, 66 टक्के लोक कामगिरीवर समाधानी
मुंबई : गेल्या साडे सात वर्षात आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून किताब पटकाविला आहे. प्रतिष्ठित माध्यम समूहाने केलेल्या 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांची जनतेने प्रथम क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे.
देशभरातील 1.36 लाखांहून अधिक लोकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात 33 टक्क्यांहून अधिक लोकांनी योगींना सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. या सर्वेक्षणात योगी यांची सलग तिसऱ्यांदा देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्याचा यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लोकांनी पसंती दिली आहे. 66 % लोक एकनाथ शिंदे यांच्या कामावर समाधानी आहेत. प्रचंड लोकसंपर्क, सतत कार्यरत राहण्याचा स्वभाव, विविध लोकोपयोगी योजना आणि मैदानात उतरून काम करण्याची तयारी या शिंदे यांच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत.

'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ सर्वाधिक पसंती मिळाली. देशातील 30 राज्यांतील जनतेला सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये सर्वाधिक मते योगींना मिळाली आहेत. लोकांना विचारण्यात आले की, ते देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री कोणाला मानतात? यावर 33 टक्क्यांहून अधिक लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या सर्वेक्षणात 13.8 टक्के लोकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दुसर्या क्रमांकाची पसंती दिलीय.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याला 9.1 टक्के लोकांनी समर्थन दिले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे सर्वेक्षणात चौथ्या क्रमांकावर आहेत, त्यांना 4.7 टक्के मते मिळाली आहेत. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे पाचव्या क्रमांकावर आहेत, ज्यांना 4.6 टक्के लोकांचे समर्थन मिळाले आहे. याशिवाय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, आसामचे हिमंता बिस्वा सरमा, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून लोकांनी समर्थन दिले आहे.
एकनाथ शिंदेंनाही पसंती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाबद्दल 35 टक्के लोक खूप समाधानी आहेत तसेच 28 टक्के लोक असंतुष्ट आहेत. 31 टक्के लोक त्यांच्या कामावर काही प्रमाणात संतुष्ट आहेत. यावरुन हे स्पष्ट होते की, महाराष्ट्रातील जनतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन आहे. यावरुन हे देखील लक्षात येते की, महाविकास आघाडीच्या भूमिकेने महाराष्ट्रातील मतदार प्रभावित झालेले नाहीत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील योजना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात अनेक योजना लागू करण्यात आल्या असून त्यांना लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून गरजू रुग्णांसाठी मदत, महिलांसाठी एसटी प्रवास तिकीटात 50 टक्के सवलतीची 'महिला सन्मान योजना', ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण, पायाभूत सुविधांच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांचा सकारात्मक दृष्टीकोन, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, शेतक-यांसाठी सौर कृषी पंप योजना, लाडकी बहिण योजना, लाडका भाऊ योजना, तसेच आता लाडका शेतकरी योजनासारख्या योजना राबविण्यात येत आहेत.
किसान सन्मान योजनेला केंद्राच्या निधीला महाराष्ट्रानेही जोड दिली आहे. थेट विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. नमो शेतकरी योजना धर्तीवर योजना, शेतक-यांसाठी एक रुपयांत पीक विमा योजना, युवकांसाठी सुरु केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांसारख्या योजनांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लोकप्रियता वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीतही चांगला स्ट्राईक रेट
एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेवर लोकसभा निवडणुकीतही जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. अवघ्या 13 जागा लढून शिवसेनेच्या 7 जागा निवडून आल्या आहेत. सध्या महाराष्ट्रभरातून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे. इरशाळवाडी भूस्खलन आपत्तीत शिंदे यांनी थेट घटनास्थळी जाऊन केलेले मदतकार्या जनतेच्या स्मरणात आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारा सेनापती अशी ओळखही त्यांनी निर्माण केली आहे. सतत कार्यरत राहण्याच्या शिंदे यांच्या वृत्तीचे महाराष्ट्राला कौतुक आहे.












Click it and Unblock the Notifications