दिल्ली विधानसभेत 55 जागा जिंकण्याचा केजरीवालांचा दावा, जाणून घ्या दिल्लीचं हवामान
Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणूकीचं राजकीय वातावरण तापलं असताना मंगळवारी सकाळी दिल्लीत हलक्या पावसाच्या सरीने वातावरण थंड केलं आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार दिवसभरात पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. दिल्लीतही 5 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
उद्या म्हणजेच मतदानाच्या दिवशी बुधवार 5 फेब्रुवारीपासून पावसाची शक्यता आहे, परंतु त्यानंतर धुके वाढू शकते. शहराच्या काही भागात अजूनही दाट धुके आहे. मंगळवारी पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, असेही हवामान खात्यानं म्हटलं आहे.

केजरीवाल यांनी 55 जागा जिंकण्याचा दावा केला
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी त्यांच्या पक्षाच्या प्रचाराचा शेवट एका भव्य रोड शो आणि जाहीर सभांनी केला. माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दावा केला की, त्यांचा पक्ष दिल्लीत 55 जागा जिंकेल आणि पुन्हा सरकार स्थापन करेल असं म्हटलं आहे.
केजरीवाल म्हणाले की, नवी दिल्ली जंगपुरा आणि कालकाजी जागांवर ऐतिहासिक विजय होईल. केजरीवाल चौथ्यांदा नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्याच वेळी पटपरगंजचे यापूर्वी आमदार राहिलेले मनीष सिसोदिया यावेळी जंगपुरा येथून निवडणूक लढवत आहेत. दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी कालकाजी येथून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाकडून तात्काळ सुनावणी घेण्यास नकार
निवृत्त न्यायमूर्ती एस. एन. धिंग्रा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. या याचिकेत निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या रोख रकमेच्या प्रलोभनांना आव्हान देण्यात आले होते.
मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या वकिलांना प्रथम आक्षेपांचे निराकरण करण्यास सांगितले. त्यानंतर प्रकरण आपोआप सूचीबद्ध केले जाईल. न्यायालयाने म्हटलं आहे की, निवडणूक प्रचार आधीच संपला असल्याने तात्काळ हस्तक्षेपाचा कोणताही परिणाम होणार नाही.
दिल्ली निवडणुकीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली पोलिसांनी शहरात सुरक्षा वाढवली आहे. जनतेला शांतता आणि सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी अनेक भागातातून पोलिसांनी पंथसंचलन करण्यात आलं
एएनआयशी बोलताना दक्षिण-पुर्वचे डीसीपी रवी कुमार सिंह म्हणाले "आजपासून निवडणूक प्रचार थांबला आहे. आम्ही रूट मार्च आणि फ्लॅग मार्च वाढवले आहेत. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू." असं त्यांनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications