Pahalgam Attack : पाकची डिजिटल घुसखोरी! एक दोन नव्हे अनेक भारतीय संस्था सायबर हल्ल्याच्या जाळ्यात
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. भारताने पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे. अशातच, पाकिस्तान भारतीय संस्थांच्या डेटावर सतत सायबर हल्ले करत असल्याचे समोर आले आहे.
'पाकिस्तान सायबर फोर्स'चा मोठा दावा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पाकिस्तान सायबर फोर्स नावाच्या एका अकाउंटने दावा केला आहे की, या गटाने भारतीय लष्करी अभियांत्रिकी सेवा आणि मनोहर पर्रिकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेतील संवेदनशील डेटामध्ये प्रवेश शिरकाव केला आहे.

संरक्षणची वैयक्तिक माहिती लीक झाली?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी संरक्षण कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स (युजरनेम आणि पासवर्ड) देखील चोरल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधीही त्यांनी अनेक वेबसाइट्सवर हल्ला केला आहे, असा दावा करण्यात आलेला आहे.
या कंपनीची वेबसाइटही हॅक
याशिवाय, सायबर ग्रुपने संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी 'आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेड'ची अधिकृत वेबसाइट हॅक करून ती डॅमेज करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. वेबसाइटवर पाकिस्तानचा ध्वज आणि खल खालिद टॅंक पोस्ट करण्यात आला होता.
ही वेबसाईड सद्या ऑफलाईन
सूत्रांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून, आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेडची वेबसाइट सध्या ऑफलाइन करण्यात आलेली आहे. जेणेकरून डेटा ऑडिट आणि सुरक्षा तपासणीद्वारे साइटचे किती नुकसान झाले आहे आणि भविष्यात असा कोणताही हल्ला कसा टाळता येईल याचा शोध घेतला जात आहे.
सायबर सुरक्षा एजन्सी अलर्ट मोडमध्ये
यासोबतच, सायबर सुरक्षा एजन्सी आणि तज्ञ सतत सायबर स्पेसवर लक्ष ठेवून आहेत. जेणेकरून पाकिस्तानशी संबंधित सायबर धोके ओळखता येतील आणि वेळेत त्याचे निराकारण करता येऊ शकते. या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, संबंधित एजन्सींकडून सुरक्षा चौकट मजबूत करण्यासाठी, डिजिटल संरक्षण प्रणाली सक्षम करण्यासाठी आणि पुढील सायबर हल्ले रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मची सायबर सुरक्षा मजबूत करणे आणि भविष्यातील कोणत्याही धोक्यांना तोंड देण्यासाठी सज्ज राहणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
पाकिस्तानी सायबर हल्ल्यांमुळे किती नुकसान?
2025 मध्ये सादर झालेल्या एका अहवालात देखील महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. भारताला सायबर गुन्ह्यांमुळे तब्बल ₹20,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा धोका यात वर्तविण्यात आलेला आहे. क्लाउडसेक या नामांकित सायबर सुरक्षाविषयक संस्थेच्या म्हणण्यानुसार, केवळ कंपन्यांच्या नावाचा वापर करून झालेल्या फसवणुकीची किंमत ₹9,000 कोटींच्या जवळपास आहे.
राजकीय आणि गुन्हेगारी उद्देशाने सायबर हल्ले
सायबर हल्ल्यांचे स्वरूप राजकीय, वैयक्तिक आणि आर्थिक फायद्यासाठी घडते. काही वेळा कंपनीतील माजी कर्मचारी किंवा प्रतिस्पर्धी संस्थेतील हॅकर्स अंतर्गत माहिती चोरण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी याचा वापर करतात. मात्र, पाकिस्तानकडून केले जाणारे हल्ले हे प्रामुख्याने राजकीय आणि रणनीतिक उद्देशांवर आधारित असतात, असा उल्लेख अहवालात करण्यात आलेला आहे.












Click it and Unblock the Notifications