दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचे भाजपावर गंभीर आरोप, निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र
Delhi Assembly Elections 2025: ऐन थंडीच्या दिवसात दिल्ली विधानसभा निवडणूकीत प्रचाराच्या मुद्द्यावरुन आता राजकारण चांगलचं तापलं आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून भाजप कार्यकर्ते आणि त्यांचे उमेदवार रमेश बिधुरी यांच्या पुतण्यावर आप कार्यकर्त्यांना धमकावण्याचे आणि हिंसाचाराची धमकी देण्याचे गंभीर आरोप केले आहेत. या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी मुख्यमंत्री आतिशी यांनी केली आहे.

'आप' कार्यकर्त्यांवर धमक्या आणि मारहाणीचा आरोप
मुख्यमंत्री आतिशी यांनी 20 जानेवारीच्या एका घटनेचा उल्लेख करत म्हटलं आहे की, गोविंदपुरीच्या लेन क्रमांक- 1 मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आप कार्यकर्त्यांशी गैरवर्तन केलं आहे. तसेच कार्यकर्त्यांना शारीरिक हिंसाचाराची धमकी दिली आहे. 'आप'च्या प्रचारकांना धमकी दिली आणि सांगितले की, जर त्यांनी या भागात प्रचार केला तर त्यांचे हातपाय तोडले जातील. रमेश बिधुरी यांच्या पुतण्यासह भाजप कार्यकर्तेही यात सामील असल्याचा आरोप आतिशी केला आहे.
याआधीही घरोघरी प्रचारादरम्यान आपच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. अशा घटना आपच्या निवडणूक प्रचारात व्यत्यय आणण्यासाठी आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी सुनियोजित कटाचा भाग असल्याचं आतिशी यांनी म्हटलं आहे.
Delhi CM and Kalkaji AAP candidate Atishi wrote a letter to the election officer complaining against Ramesh Bidhuri's nephew and BJP workers in the Kalkaji assembly, allegations that they are threatening AAP workers. pic.twitter.com/bCS59agjKk
— ANI (@ANI) January 21, 2025
आतिशी यांचे भाजपवर गंभीर आरोप
भाजप कार्यकर्ते सतत आप कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. ही एक वेगळी घटना नाही, असा दावा आतिशी यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ही एक संघटित मोहीम आहे. ज्याचा उद्देश 'आप'ला परिसरात प्रचार करण्यापासून रोखणे आहे. आतिशी यांनी आरोप केला की रमेश बिधुरी यांनी सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली आणि अपमानास्पद टिप्पणी केली. परंतु असे असूनही कोणतीही कारवाई झाली नाही, असं अतिशी यांनी म्हटलं आहे.
आतिशीने असा दावाही केला की, तणावादरम्यानच्या काही घटना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आल्या होत्या. जे भाजप कार्यकर्त्यांच्या आक्रमक आणि बेकायदेशीर वर्तनाचा पुरावा आहे.
निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न
अतिशी यांनी या घटनांना निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेसाठी आणि लोकशाही मूल्यांसाठी धोका असल्याचे वर्णन केलं आहे. सर्व पक्षांना समान संधी मिळावी आणि निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडतील याची खात्री करणे ही निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.
आतिशी यांनी आपल्या पत्रात निवडणूक आयोगाने तात्काळ हस्तक्षेप करावा आणि भाजप कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, जर या आरोपांकडे दुर्लक्ष केले तर त्याचा परिणाम निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच होणार नाही तर उलट मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल.
कालकाजी विधानसभा मतदार संघातील वाढता तणाव
ही परिस्थिती कालकाजी विधानसभेतील वाढत्या निवडणूक तणावाचे प्रतिबिंब आहे. या मतदार संघात आप आणि भाजपमध्ये काटे की टक्कर बघायला मिळत आहे. 'आप'ने भाजपवर पद्धतशीरपणे धमकावण्याची मोहीम राबवल्याचा आरोप केला आहे. तर भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.












Click it and Unblock the Notifications