सरकार स्थापनेपूर्वी एनडीएची डोकेदुखी वाढली, टीडीपीने मागितली 6 मोठी मंत्राल
Mumbai: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी आणि नितीशकुमार यांच्या जेडीयूचे महत्त्व खूपच वाढले आहे. त्यामुळेच आता दोन्ही पक्ष प्रमुख मंत्रिपदांची मागणी करत आहेत. टीडीपीच्या सूत्रांनुसार, पक्षाने एनडीएसमोर सहा मोठ्या मंत्रालयांची मागणी ठेवली आहे. टीडीपीलाही लोकसभा अध्यक्षपद हवे आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, टीडीपीची भूमिका लवचिक आहे.
टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू बुधवारी (5 जून) दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेजारी बसलेले त्यांचे फोटोही समोर आले. नितीशकुमारही नायडूंच्या शेजारी बसलेले दिसले.

टीडीपी सध्या एनडीएमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. त्यांनी 16 जागा जिंकल्या आहेत. यानंतर जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांचे 12 खासदार आहेत. एनडीएचा सर्वात मोठा पक्ष भाजप आहे, ज्याने 240 जागा जिंकल्या आहेत.
टीडीपीला मोदी 3.0 मध्ये बजावायची आहे महत्त्वाची भूमिका
द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नायडू यांनी स्पष्ट केले आहे की त्यांना मोदी 3.0 सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावायची आहे. त्यांनी आपल्या मागण्यांची यादी भाजप नेतृत्वाला दिल्याचे सांगण्यात आले. यामध्ये लोकसभा अध्यक्षपद आणि किमान पाच महत्त्वाच्या मंत्रालयांची मागणी केली आहे. टीडीपीने अर्थ मंत्रालय, जलशक्ती मंत्रालयासारखे विभागही देण्याची मागणी केली आहे.
टीडीपीला लोकसभा अध्यक्ष का हवे आहे?
वास्तविक, टीडीपीला सभापतीपद हवे आहे कारण ते लोकसभेतील सर्वात शक्तिशाली पद असेल. इतकंच नाही तर त्रिशंकू संसदेच्या स्थितीत सभापती महत्त्वाची भूमिका बजावतील. पक्षाचे दिवंगत नेते जीएमसी बालयोगी यांनी 1998 ते 2002 या काळात अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये स्पीकर म्हणूनही काम केले होते.
टीडीपीच्या एका खासदाराने सांगितले की, पक्षाला ग्रामीण विकास, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, बंदरे आणि जहाजबांधणी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जलशक्ती ही मंत्रालये हवी आहेत. आंध्र प्रदेशला सध्या निधीची नितांत गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आंध्र प्रदेशातही टीडीपीला बहुमत मिळाले आहे.
नितीश यांनी मागितली तीन मंत्रिपदे
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, नितीश कुमार यांच्या जेडीयूनेही तीन मंत्रालयांची मागणी एनडीएसमोर ठेवली आहे. याशिवाय बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही करण्यात आली आहे. जेडीयूने चार खासदारांसाठी एक मंत्रालयाचा फॉर्म्युला सरकारसमोर ठेवला आहे. जेडीयूचे 12 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना 3 मंत्रालये हवी आहेत. रेल्वे, कृषी आणि अर्थ मंत्रालये आपल्या खात्यात यावीत, अशी नितीशकुमारांची इच्छा आहे. रेल्वे मंत्रालयाला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.












Click it and Unblock the Notifications