CBSE Exam 2026 : सीबीएसईच्या 10, 12वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 2 वेळा देता येणार!
CBSE Exam 2026 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार, १७ फेब्रुवारी २०२६ पासून परीक्षा सुरू होणार आहेत.
सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांच्या माहितीनुसार, यावर्षीचा सर्वात मोठा बदल म्हणजे, २०२५-२६ च्या शैक्षणिक सत्रापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
हा निर्णय विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी देण्यासाठी घेण्यात आला आहे.

परीक्षांचे वेळापत्रक
- दहावीची पहिली परीक्षा : १७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२६ या काळात होईल.
- दहावीची दुसरी परीक्षा (पर्यायी): १५ मे ते १ जून २०२६ या काळात होईल.
- बारावीची परीक्षा: १७ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२६ या काळात होईल.
उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन प्रत्येक विषयाच्या परीक्षेनंतर सुमारे १० दिवसांनी सुरू होईल आणि १२ दिवसांत पूर्ण होईल. यामुळे निकालाची प्रक्रिया जलद होण्यास मदत होईल.
दोन परीक्षांच्या नियमांमधील मुद्दे!
हा नवा नियम २०२५-२६ सत्रापासून लागू केला जाईल. या नियमांतर्गत विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वपूर्ण पर्याय मिळतील.
दोन परीक्षा देणे बंधनकारक नाही
विद्यार्थी वर्षातून एकदा किंवा दोन्ही परीक्षा देऊ शकतात. जर एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात पहिल्या परीक्षेत चांगली कामगिरी करू शकला नाही, तर तो दुसऱ्या परीक्षेत फक्त त्याच विषयाची परीक्षा देऊ शकतो.
सर्वोत्तम गुणांचा विचार
दोन्ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या परीक्षेत चांगले गुण मिळाले असतील, तोच निकाल अंतिम मानला जाईल. यामुळे विद्यार्थ्यांचे गुण कमी होण्याचा धोका राहणार नाही.
पूरक परीक्षा रद्द
दोन परीक्षांच्या नियमामुळे आता दहावीच्या पुरवणी परीक्षा रद्द केल्या जातील.
नोंदणी आणि परीक्षा शुल्क
दोन्ही परीक्षांसाठी एकदाच नोंदणी करावी लागेल आणि शुल्क एकत्र आकारले जाईल.
प्रात्यक्षिक परीक्षा एकदाच
प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षा वर्षातून एकदाच, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये घेतल्या जातील.
सरकारचा निर्णय आणि धोरण!
ऑगस्ट २०२४ मध्येच शिक्षण मंत्रालयाने वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा मसुदा तयार केला होता. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले होते की, ज्याप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी JEE परीक्षा वर्षातून दोनदा होते, त्याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी होऊन त्यांना आपले प्राविण्य सिद्ध करण्याची दुसरी संधी मिळेल. हा एक क्रांतिकारी बदल असून, यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications