'नरेंद्र मोदी भित्रे, इंदिरा गांधी त्यांच्यापेक्षा सक्षम होत्या';बिहारमध्ये राहुल गांधींचा घणाघात!
Bihar election 2025, Rahul gandhi on Narendra Modi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (३० ऑक्टोबर) बिहारमधील नालंदा येथील नुरसराई येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
त्यांनी पंतप्रधान मोदींवर 'भित्रे' असल्याचा आरोप करत, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सामर्थ्याची आठवण करून दिली. राहुल गांधींच्या या विधानांमुळे राजकीय वातावरण तापले असून भाजपने निवडणूक आयोगाकडे या विधानावरुन तक्रार दाखल केली आहे.

मोदी-ट्रम्प संबंधांवर गंभीर आरोप
राहुल गांधी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले, "मोदी भित्रे आहेत. इंदिरा गांधींकडे या माणसापेक्षा जास्त शक्ती होती. मोदी ट्रम्पला घाबरतात. अमेरिकेचे अध्यक्ष हे ५० वेळा म्हणाले आहेत, मी नरेंद्र मोदींना धमकावून 'ऑपरेशन सिंदूर' थांबवले आहे."
ट्रम्प वेगवेगळ्या देशांमध्ये जात आहेत आणि ते आपला अपमान करत आहेत. ट्रम्प म्हणतात की त्यांनी मोदींना नमन करायला लावले आहे. तरीही मोदींच्या तोंडातून एकही शब्द निघत नाही. ट्रम्प भारतीय सैन्य आणि हवाई दलाबद्दल बोलत आहेत, तरीही मोदी गप्प आहेत.
राहुल म्हणाले, "मी मोदींना आव्हान देतो की त्यांनी बिहारमध्ये येऊन ट्रम्प खोटे बोलत आहेत, असे सांगावे." इंदिरा गांधींनी अमेरिकेला गप्प केले होते, पण मोदी ट्रम्पसमोर नमले, असा आरोप त्यांनी केला.
भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
राहुल गांधी यांच्या विधानानंतर भाजपने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपने त्यांच्यावर पंतप्रधान मोदींविरुद्ध अपमानास्पद आणि वैयक्तिक टिप्पणी केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपने म्हटले आहे की, राहुल गांधींनी २९ ऑक्टोबरच्या रॅलीत केलेली टिप्पणी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करते.
नीतीश कुमार मोदींच्या 'रिमोट कंट्रोल'वर
राहुल गांधींनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही निशाणा साधला. नितीश कुमार २० वर्षांत बिहारचा कायापालट केल्याचा दावा करतात, पण बिहारमध्ये चांगले शिक्षण आणि आरोग्यसेवा उपलब्ध होऊ शकते का? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. ते म्हणाले, "बिहारच्या रुग्णालयात लोक जगण्यासाठी नाही, तर मरण्यासाठी जातात."
"पंतप्रधानांकडे नितीश कुमारांचा रिमोट आहे. नितीश कुमारांना जे हवे आहे ते पंतप्रधान करतील. नितीश कुमार बिहार चालवत नाहीत. अमित शहा आणि मोदी सरकार चालवतात," असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
छठपूजेवर 'नाटक' केल्याचा आरोप
राहुल गांधी यांनी छठ उत्सवादरम्यान पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदी छठपूजेदरम्यान नाटक करत आहेत, यमुनेऐवजी स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत आहेत. ही छठपूजा मते मिळवण्यासाठी रंगवलेले नाटक आहे. ते म्हणाले की, मोदी मते मिळवण्यासाठी स्टेजवर नाचू शकतात. पूजा असो किंवा बिहारच्या परंपरा; त्यांचे एकमेव उद्दिष्ट मते मिळवणे हे आहे. मोदींना लोकांच्या समस्यांशी काहीही संबंध नाही; त्यांना फक्त प्रचार आणि सत्तेत राहण्याची चिंता आहे.












Click it and Unblock the Notifications