मोठी बातमी : बिहार निवडणुकीसाठी NDAचे जागावाटप जाहीर; BJP-JDUसह पासवान यांच्या पक्षाला किती जागा?
Bihar Election 2025 NDA Final Seat Sharing : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अखेर आपल्या घटक पक्षांमधील जागावाटपाची घोषणा केली आहे. या निर्णयानुसार, भाजप आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) या दोन प्रमुख पक्षांना समसमान जागा मिळाल्या असून, चिराग पासवान यांच्या पक्षाला लक्षणीय जागा देण्यात आल्या आहेत.

एनडीएचे अंतिम जागावाटप खालीलप्रमाणे:
- भारतीय जनता पक्ष (भाजप) - १०१
- जनता दल युनायटेड (जेडीयू) - १०१
- लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (चिराग पासवान) : २९
- राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) (उपेंद्र कुशवाहा) : ६
- हिंदुस्तान अवम मोर्चा (एचएएम) (जीतन राम मांझी) : ६
या जागावाटपानुसार, भाजप आणि जेडीयू प्रत्येकी १०१ जागांवर आपले उमेदवार उभे करतील. तर, चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी (आर) पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) आणि जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तान अवम मोर्चा (एचएएम) हे प्रत्येकी ६ जागांवर निवडणूक लढवतील.
मागील निवडणुकीतील स्थिती (२०२०)
भाजप : २०२० च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएची स्थिती आणि यंदाचे चित्र यात लक्षणीय बदल झाले आहेत. २०२० मध्ये भाजपने ११० जागा लढवून ७४ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपने ९ जागा कमी लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
जेडीयू : मागील निवडणुकीत जेडीयूने ११५ जागा लढवल्या होत्या आणि ४३ जागांवर विजय मिळवला होता. यंदा जेडीयूच्या वाट्याला १४ जागा कमी आल्या आहेत.
एलजेपी : २०२० मध्ये, तत्कालीन लोक जनशक्ती पक्षाने (एलजेपी) एनडीएपासून वेगळे होत एकट्याने निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी १३५ जागांवर उमेदवार उभे केले, ज्यात त्यांनी विशेषतः जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले होते आणि त्यांना केवळ एकच जागा मिळाली होती.
एलजेपीमध्ये फूट आणि बदललेले समीकरण
२०२० च्या निवडणुकीनंतर जून २०२१ मध्ये एलजेपीमध्ये फूट पडली. पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील गटाने 'राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष' (आरएलजेपी) स्थापन केला, तर चिराग पासवान यांच्या गटाचे नाव 'लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)' असे झाले.
यंदाच्या निवडणुकीत, चिराग पासवान यांचा एलजेपी (रामविलास) पक्ष एनडीएचा भाग आहे, तर पशुपती पारस यांचा पक्ष महाआघाडीसोबत युती करून निवडणूक लढवत आहे. चिराग पासवान यांना मिळालेल्या २९ जागांमुळे एनडीएच्या विजयात त्यांच्या पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
एकूण जागावाटप पाहता, एनडीएने सर्व घटक पक्षांना सामावून घेत निवडणुकीसाठी एक मजबूत आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या निकालात त्याचा काय फायदा होणार हे आता जनता ठरवणार एवढे मात्र निश्चित आहे.












Click it and Unblock the Notifications