"ममता दीदी घुसखोरी रोखू शकत नाहीत, भाजप आल्यास पक्षीही शिरू शकणार नाही"; शहांचा हुंकार!
पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर (TMC) कडाडून हल्ला चढवला आहे.
"ममता सरकार घुसखोरांना आश्रय देत असून ते देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यास सीमेवरून एक चिमणीही पंख मारू शकणार नाही," अशा शब्दांत शहा यांनी घुसखोरीच्या मुद्द्यावरून वादळ उठवले आहे.

घुसखोरी : देशाच्या सुरक्षेचा प्रश्न
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना अमित शहा यांनी घुसखोरी हा बंगालचा सर्वात मोठा शाप असल्याचे सांगितले. "बंगालची जनता घुसखोरांमुळे त्रस्त आहे. जे सरकार स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी घुसखोरांना आश्रय देते, ते राष्ट्राच्या सुरक्षेसाठी घातक आहे. हे थांबवण्याची ताकद केवळ भाजपमध्येच आहे," असे ते म्हणाले.
शहा यांनी प्रश्न उपस्थित केला की, "जर काश्मीर, आसाम आणि त्रिपुराच्या सीमेवर घुसखोरी रोखली जाऊ शकते, तर फक्त बंगालमध्येच ती का सुरू आहे?"
महिला सुरक्षा आणि आरजी कर प्रकरण
अमित शहा यांनी संदेशखाली आणि आरजी कर रुग्णालयातील धक्कादायक घटनांचा उल्लेख करत ममता सरकारला धारेवर धरले. महिलांना सुरक्षा देण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
"आता मलमपट्टी करून काहीही होणार नाही, बंगालमधील हिंदूंच्या मनावर खोल जखमा झाल्या आहेत. जनतेने आता हे 'सांप्रदायिक' सरकार हटवण्याचे मन बनवले आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
विकासाच्या गतीला ममतांनी लावला 'ब्रेक'
बंगालच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देताना शहा म्हणाले की, ज्या राज्यात पहिला मोटार कारखाना, स्टील प्लांट आणि आधुनिक विद्यापीठे होती, तिथे आज विकास थांबला आहे.
योजनांना विरोध : "ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या योजनांना मुद्दाम विरोध करतात. आयुष्मान भारत योजना लागू न केल्याने गरिबांचे नुकसान झाले, तर शेतकऱ्यांचे १० हजार कोटी रुपये बंगाल सरकारच्या त्रुटीमुळे परत गेले," असा दावा त्यांनी केला.
अर्धा नाश कम्युनिस्टांनी, उरलेला ममतांनी : "बंगालचा अर्धा नाश कम्युनिस्टांच्या काळात झाला आणि उरलेला नाश ममतांनी पूर्ण केला," असा टोला त्यांनी लगावला.
शहांचे ममतांना थेट सवाल
अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काही बोचरे प्रश्न विचारले आहेत.
- सीमेवर कुंपण घालण्यासाठी जागा न देणारे तुमचे सरकार का अडथळे निर्माण करत आहे?
- घुसखोर गावात शिरल्यावर त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली जात नाही?
- केंद्र सरकारच्या मेट्रो प्रकल्पांसाठी जमीन देण्यास टाळाटाळ का केली जाते?
'२०२६ मध्ये भाजपचे सरकार'
२०२६ च्या निवडणुकीत भाजप २९४ जागांच्या रणधुमाळीत प्रचंड बहुमताने विजयी होईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींच्या विरोधात मानसिकता पसरवली जात असून, मुख्यमंत्री पंतप्रधान स्टेजवर असताना प्रोटोकॉल पाळत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
जेव्हा एका पत्रकाराने भाजपमधील '७५ वर्षांच्या वयोमर्यादे'बद्दल प्रश्न विचारला, तेव्हा शहा यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले, "माझ्या पक्षाची काळजी करू नका, बंगालच्या भविष्याची काळजी करा."
निवडणुकीचे समीकरण
पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ ७ मे २०२६ रोजी संपत आहे. मार्च-एप्रिल २०२६ मध्ये होणाऱ्या या निवडणुकीत भाजप आणि टीएमसीमध्ये 'आरपारची लढाई' होणार असल्याचे अमित शहांच्या या दौऱ्याने स्पष्ट झाले आहे.












Click it and Unblock the Notifications