VIDEO : अमित शाह विरोधकांवर संतापले; म्हणाले, 'पुढील २० वर्षे विरोधी बाकांवरच बसाल!'
संसदेत 'ऑपरेशन सिंदूर' या संवेदनशील मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर निवेदन करत असताना विरोधकांनी गोंधळ घातल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचंड संतापले. जयशंकर यांच्यावर विश्वास न ठेवता विरोधक परदेशावर विश्वास ठेवत असल्याचा आरोप करत शाह यांनी त्यांना चांगलेच फटकारले. त्यांचे असेच वर्तन राहिल्यास पुढील २० वर्षे ते विरोधी बाकांवरच बसतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकसभेत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहलगाम हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात विस्तृत निवेदन दिले. पहलगाम हल्ल्याच्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. वेंस यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून बोलून हल्ल्याचा निषेध केला आणि भारताला आत्मसंरक्षणाचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले, असे जयशंकर यांनी सभागृहाला सांगितले.
जयशंकर यांनी हेही स्पष्ट केले की, २२ एप्रिल ते १७ जून या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणताही थेट संपर्क झाला नव्हता. मात्र याच काळात पाकिस्तानकडून भारताला फोन आले होते, ज्यात त्यांनी पुढे कोणताही हल्ला करणार नाही असे सांगितले होते. यावर भारताने युद्धबंदीबाबतची कोणतीही गोष्ट पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) द्वारे औपचारिकपणे यायला हवी, असे स्पष्ट केले होते.
जयशंकर यांनी ठामपणे सांगितले की, या घटनेतून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. युद्धबंदीमध्ये कोणतीही मध्यस्थी झाली नाही आणि त्यावेळी पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नव्हती. नागरिकांचे रक्षण करणे हेच आमचे कर्तव्य आहे, असे जयशंकर यांनी म्हणताच विरोधकांनी गोंधळ सुरू केला आणि अनेक प्रश्न उपस्थित केले.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालताच गृहमंत्री अमित शाह यांनी संताप व्यक्त करत म्हटले, "तुम्हाला (विरोधकांना) भारत देशाचे परराष्ट्र मंत्री जे बोलत आहेत, त्यावर विश्वास नाही, तुम्हाला दुसऱ्या देशावर विश्वास आहे. तुमचं असंच वर्तन राहिलं तर तुम्ही २० वर्षे तिथेच विरोधी पक्षातच बसणार."
शाह पुढे म्हणाले की, 'मी त्यांच्या पक्षातील परराष्ट्र संबंधांचे महत्त्व समजू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या पक्षाच्या सगळ्या गोष्टी इथे सभागृहात थोपल्या जाव्यात.' याच कारणामुळे ते विरोधी बाकांवर बसले आहेत आणि पुढील २० वर्षांपर्यंत बसलेलेच राहतील, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला.
संसदेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सुनावले, "जेव्हा त्यांचे (विरोधकांचे) अध्यक्ष बोलत होते, तेव्हा आम्ही त्यांना संयमाने ऐकत होतो. मी तुम्हाला उद्या सांगेन की त्यांनी किती खोटे बोलले आहेत. आता ते सत्य ऐकू शकत नाहीत. जेव्हा इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत आहे, आणि परराष्ट्र मंत्री बोलत आहेत, तर काय हे चांगले दिसते की विपक्ष त्यांना त्रास देत आहे? अध्यक्ष महोदय, आपण त्यांना समजावा, अन्यथा आम्ही पण नंतर आपल्या सदस्यांना काही समजावू शकणार नाही." या संपूर्ण चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी दिसून आली.












Click it and Unblock the Notifications