अहमदाबाद दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला, तपासाला मिळणार वेग; A ते Z सत्य उलगडणार
गुजरातमधील अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान दुर्घटनेतील तपासाला आता महत्त्वाचा वाटा मिळाला आहे. दुर्घटनाग्रस्त विमानाचा एक ब्लॅक बॉक्स अखेर सापडला असून, त्याचा तपास आता दिल्लीतील प्रयोगशाळेत सुरू होणार आहे.

या ब्लॅक बॉक्समध्ये असलेल्या रेकॉर्डिंगमुळे अपघाताचे नेमके कारण शोधण्यास मोठी मदत होणार आहे. मात्र, दुसरा ब्लॅक बॉक्स अद्यापही सापडलेला नाही आणि त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
ब्लॅक बॉक्समुळे तपासाला वेग
सापडलेल्या यंत्रांमध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) यांचा समावेश आहे. या दोन्ही यंत्रांच्या माध्यमातून विमानाच्या टेक-ऑफ आधीपासून ते अपघाताच्या क्षणापर्यंतचे सर्व तांत्रिक तपशील व संवाद मिळणार आहेत. या माहितीच्या आधारे अपघाताच्या संभाव्य कारणांवर अधिक स्पष्टता येईल.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
ब्लॅक बॉक्स ही एक सामान्य संज्ञा असून, त्यामध्ये दोन प्रमुख उपकरणं येतात:
फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR): विमानाच्या वेग, उंची, इंजिनची स्थिती, दिशा अशा अनेक तांत्रिक बाबींची नोंद ठेवतो.
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR): वैमानिक आणि सहाय्यकांमधील संवाद व कंट्रोल रूमशी झालेल्या संभाषणांची ध्वनिमुद्रिका साठवतो.
हे दोन्ही उपकरणं अपघातानंतरच्या तपासासाठी अतिशय निर्णायक असतात.
पंतप्रधान मोदींची घटनास्थळी पाहणी
या दुर्घटनेनंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सुमारे 20 मिनिटे स्थानावर थांबून बचाव आणि मदतकार्याबाबत अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यानंतर ते स्थानिक रुग्णालयातही गेले आणि उपचार घेत असलेल्या जखमींना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
अमित शाह यांनी दिली प्रतिक्रिया
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल घटनास्थळी भेट दिली. अपघाताची माहिती मिळताच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, नागरी उड्डाण मंत्री, गृहविभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित यंत्रणांशी तातडीने चर्चा करून मदतकार्य सुरू केल्याचं सांगितलं. "हे दु:ख शब्दांत मावणारं नाही. दुर्घटनाग्रस्तांपैकी एका जिवंत राहिलेल्या प्रवाशाला भेटलो. मृतांची अंतिम संख्या डीएनए तपासणीनंतर स्पष्ट होईल," असं शाह यांनी म्हटलं.
दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू, एकमेव प्रवासी वाचला
या भीषण दुर्घटनेत 241 प्रवासी आणि 24 स्थानिक रहिवासी असे एकूण 265 जण मृत्युमुखी पडले. हे विमान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे झेपावलं होतं, मात्र टेक-ऑफनंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदांतच विमानाने नियंत्रण गमावून गडगडत मेघाणी नगर भागातील इमारतीवर आपटले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
टाटा समूहाकडून मोठी मदतीची घोषणा
या दुर्घटनेनंतर टाटा समूह पुढे सरसावले असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, अपघातात जखमी झालेल्यांच्या वैद्यकीय उपचारांचा सर्व खर्च टाटा समूह उचलणार आहे. याव्यतिरिक्त, डॉक्टरांचे हॉस्टेलही नव्याने बांधून देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
अपघातामागील चार प्राथमिक शक्यता
तज्ज्ञांच्या मते, या अपघातामागील चार संभाव्य कारणं असू शकतात:
विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड एकाच वेळी झाला असावा.
लँडिंग गियरचा बिघाड, ज्यामुळे वेग कमी करता आला नसावा.
पक्ष्याचा धडक बसलेली असण्याची शक्यता, जे टेकऑफवेळी मोठा धोका ठरतो.
फ्लॅप्स अकार्यक्षम स्थितीत राहिल्यामुळे विमानाने भरकटले असावे.
ही दुर्घटना देशाला हादरवून टाकणारी ठरली आहे. केंद्र व राज्य सरकार, नागरी उड्डाण विभाग आणि स्थानिक प्रशासन सर्वजण मदत व बचाव कार्यात झोकून देऊन काम करत आहेत. तपासाची दिशा ब्लॅक बॉक्समधून मिळालेल्या माहितीवर अवलंबून असणार आहे. पुढील काही दिवसांत या दुर्घटनेमागील सत्य स्पष्ट होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications