मोठी बातमी ! अनेक खासदारांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बिघाड, काय घडलं?
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 2455 या विमानाला रविवारी आकाशात एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. या घटनेमुळे विमानात असलेल्या शेकडो प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. आधीच उशिराने निघालेल्या या विमानाला टेकऑफनंतर लगेचच जोरदार आणि असामान्य धक्के जाणवले. त्यानंतर सुमारे एक तासाने वैमानिकाने 'तांत्रिक बिघाड' झाल्याची शक्यता व्यक्त करत विमान चेन्नईच्या दिशेने वळवले.

या विमानात काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक खासदार प्रवास करत होते. वेणुगोपाल यांनी सोशल मीडियावर लिहिले की, हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव होता आणि सर्व प्रवासी "मृत्यूच्या दाढेतून परत आलो."
एक तासानंतर विमान वळवले
वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, उशिराने उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाला असामान्य आणि जोरदार धक्के जाणवले. सुमारे एक तासानंतर वैमानिकाने 'फ्लाइट सिग्नल फॉल्ट'ची माहिती दिली आणि विमान चेन्नईच्या दिशेने वळवले.
पहिल्या लँडिंगमध्ये संकट
खासदारांनी दावा केला की, लँडिंगच्या आधी सुमारे दोन तास विमान चेन्नई विमानतळावर घिरट्या घालत होते. पहिल्या प्रयत्नात जेव्हा विमान उतरणार होते, तेव्हा त्याच धावपट्टीवर दुसरे विमान असल्याचा संदेश आला. वैमानिकाने लगेचच विमान पुन्हा वर घेतले आणि दुसऱ्या प्रयत्नात सुरक्षित लँडिंग केले. ते म्हणाले, "आम्ही वैमानिकाच्या कौशल्यामुळे आणि नशिबाने वाचलो, परंतु प्रवाशांची सुरक्षा नशिबावर सोडता कामा नये."
के.सी. वेणुगोपाल यांनी लिहिले, "मी, इतर काही खासदार आणि शेकडो प्रवासी तिरुवनंतपुरम ते दिल्ली जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 2455 या विमानात होतो. आज हे विमान एका मोठ्या अपघाताच्या अगदी जवळ पोहोचले होते. उशिराने सुरू झालेला हा प्रवास एका भयानक अनुभवात बदलला. उड्डाण भरल्यानंतर लगेचच आम्हाला अत्यंत जोरदार आणि असामान्य धक्के जाणवले. सुमारे एक तासानंतर कॅप्टनने 'फ्लाइट सिग्नल फॉल्ट'ची माहिती दिली आणि विमान चेन्नईकडे वळवले. जवळपास दोन तास आम्ही लँडिंगची परवानगी मिळण्याची वाट पाहत आकाशात घिरट्या घालत होतो. त्याचवेळी, पहिल्या प्रयत्नात लँडिंग करताना एक थरारक क्षण आला- त्याच धावपट्टीवर दुसरे विमान होते. त्याच क्षणी कॅप्टनच्या जलद आणि योग्य निर्णयामुळे विमान पुन्हा वर घेतले गेले आणि सर्वांचे प्राण वाचले. दुसरा प्रयत्न यशस्वी झाला आणि विमान सुरक्षित उतरले."
एअर इंडियाचे स्पष्टीकरण
एअर इंडियाने खासदारांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, चेन्नईमधील पहिल्या लँडिंगदरम्यान धावपट्टीवर कोणतेही विमान नव्हते. 'गो-अराऊंड' म्हणजेच पुन्हा वर घेण्याचा निर्देश चेन्नई एटीसीने (Air Traffic Control) खराब हवामान आणि तांत्रिक खबरदारी म्हणून दिला होता. एअरलाइनने म्हटले की, वैमानिक संपूर्ण प्रशिक्षण आणि नियमांनुसारच काम करत होते आणि प्रवाशांची सुरक्षा ही नेहमीच त्यांची पहिली प्राथमिकता असते.
रात्री उशिरा दिल्लीला पोहोचले विमान
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, विमानाने तिरुवनंतपुरम येथून रात्री ८:१७ वाजता उड्डाण केले आणि रात्री १०:३५ वाजता चेन्नई येथे उतरले. त्यानंतर रात्री १:४० वाजता तेथून निघाले आणि सकाळी ३:५८ वाजता दिल्लीला पोहोचले.
एअर इंडियावर सातत्याने प्रश्नचिन्ह
गेल्या काही दिवसांपासून एअर इंडियावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. १२ जून रोजी झालेल्या एका भीषण अपघातात २४१ प्रवासी आणि जमिनीवरील १९ लोकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय, गेल्या आठवड्यात सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या विमानात प्रवाशांना कॉकपिटजवळ झुरळे दिसली होती, ज्यावर एअरलाइनने माफी मागितली, पण आपल्या निवेदनात म्हटले की, "ग्राउंड ऑपरेशन्सदरम्यान कीटक आत येऊ शकतात."












Click it and Unblock the Notifications