ज्ञानमंदिरातच हत्याकांड! 10वीच्या मुलाने आठवीच्या मुलाला चाकूने भोसकले, या शहरात घडला थरार!
Ahmedabad School Murder News : विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे मंदिर असलेल्या शाळेत जर कुणी निर्घृणपणे मारले गेले तर? अहमदाबाद शहरात अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
खोखरा भागातील सेव्हन्थ-डे अॅडव्हेंटिस्ट शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याने आठवीच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या केली. केवळ एका किरकोळ वादाने हे विकृत रूप धारण केले आणि एका निष्पाप मुलाचा जीव घेतला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, शाळा आणि परिसरात प्रचंड तणावपूर्ण वातावरण आहे.

किरकोळ वादाचे भयानक रूपांतर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दोन विद्यार्थ्यांमधील छोट्याशा भांडणातून सुरू झाली. पण, दहावीच्या विद्यार्थ्याने हा वाद मिटवण्याऐवजी त्याला वेगळेच वळण दिले.
त्याने बाहेरून काही मित्रांना बोलावले आणि शाळेबाहेरच आठवीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने मणिनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण दुर्दैवाने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सिंधी समाजाचा संताप आणि शाळेत तोडफोड
या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मृत विद्यार्थी सिंधी समाजातील असल्याने त्यांचा संताप अनावर झाला. शेकडो लोक शाळेच्या आवारात जमा झाले आणि त्यांनी शाळेची तोडफोड सुरू केली.
खिडक्या, दरवाजे, शाळेच्या बस आणि इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. जमावाने मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला. परिस्थिती इतकी बिघडली की, पोलिसांनी घटनास्थळी येऊनही जमावाने आपला राग कायम ठेवला.
राजकीय आणि सामाजिक संघटनांची उपस्थिती
घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच मणिनगरचे आमदार, डीसीपी बलदेव देसाई, एसीपी, तसेच बजरंग दल, विहिंप आणि अभाविपचे कार्यकर्ते भगवे गमछे घालून शाळेत पोहोचले. त्यांनी 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या. सुमारे दोन हजार लोकांच्या जमावाने शाळेबाहेर रस्ता अडवून पोलिसांविरोधातही घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अखेर लाठीचार्ज करावा लागला.
शाळा प्रशासनावर गंभीर आरोप
पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यांचा दावा आहे की, हल्ला होण्याआधीही आरोपी विद्यार्थ्याने बाहेरील लोकांना शाळेत बोलावले होते आणि ही घटना शाळा प्रशासनाच्या डोळ्यासमोर घडली. तसेच, जखमी विद्यार्थ्याला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही, ज्यामुळे त्याचा जीव वाचू शकला नाही, असाही आरोप पालकांनी केला आहे.
तणावपूर्ण शांतता आणि पुढील तपास
या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून, शाळेच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यांमधील वाढत्या हिंसेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना केवळ एका मुलाच्या मृत्यूची नाही, तर समाजात वाढत असलेल्या द्वेषाची आणि असुरक्षिततेचीही लक्षण आहे, असे दिसते.












Click it and Unblock the Notifications