दिल्लीतील तरुण पिढी आता सुशासन बघणार... दिल्लीतील विजयानंतर मोदींचा 'आप'वर जोरदार प्रहार
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. आम आदमी पार्टी, भाजप व काँग्रेसमध्ये प्रमुख तिरंगी लढतीचा अंदाज होता. मात्र भाजपने दणदणीत विजय मिळवत दिल्ली काबीज केली. निवडणुकीत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. निकालांनुसार भाजपला 48 जागा तर आपला फक्त 22 जागा मिळाल्या आहेत.

मोदींचे दमदार भाषण
भाजपच्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. दिल्लीला आपदामधून मुक्त केलं. दिल्लीकरांमध्ये आज वेगळाच उत्साह दिसतोय, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. दिल्लीकरांनी मोदीच्या गॅरंटीवर विश्वास ठेवला. आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे. डबल इंजिन सरकार दिल्लीचा डबल विकास करणार असल्याचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं.
काय म्हणाले मोदीजी?
कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदीजींनी प्रथम कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. दिल्लीतील जनतेने स्पष्ट केलं, दिल्लीचे मालक दिल्लीची जनता आहे. जनतेनं शार्टकटच्या राजकारणाला नाकारलं. शाँर्टकटच्या राजकारणाचा शाँर्टसर्किट झाला. राजकारणात खोटं बोलणाऱ्यांना दिल्लीकरांनी नाकारलं. तरुण पिढी पहिल्यांदाच भाजपचं सुशासन बघणार आहे. विश्वास आणि विकासाचा दिल्लीत विजय झाला. हरियाणा, महाराष्ट्रात भाजपनं नवा रेकॉर्ड बनवला, अशा शब्दांत मोदीजींनी मतदारांचे आभार मानले.
आप-काँग्रेसवर साधला निशाणा
आपल्या भाषणात मोदीजींनी आपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, दिल्लीचे मालक बनू पाहणाऱ्यांना जनतेनं घरी बसवलं. जिथं NDA तिथे विकासाने नवी उंची गाठली. सरकारच्या योजनांचा जास्त लाभ मध्यमवर्गीयांना मिळतो. आमच्या पक्षानं नेहमी मध्यमवर्गीयांना प्राथमिकता दिली. प्रत्येक राज्यात महिलांना दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली. आमचं सरकार दिल्लीला एक आधुनिक शहर बनवणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications