थंडी वाढलीय..? घाबरु नका; स्वयंपाकघरातले 'हे' पाच पदार्थ ठेवतात शरीराला आतून गरम
Boost immunity in winter- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीने गरम झालेले वातावरण आता थंड व्हायला लागलेय. वातावरणातही थंडीचे प्रमाण वाढलेय. अशावेळी आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. सर्दी, खोकला यासारख्या समस्या या दिवसांत सामान्य असतात. अशा परिस्थितीत थंडीपासून वाचण्यासाठी स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या गरम मसाल्यांचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते. त्यातून अनेक आजारांपासूनही आपला बचावही होतो. आपल्या मसाल्याच्या डब्यातील कोणते पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी चांगले असतात ते आपण पाहूयात...

हळद :
हळद हा एक असा मसाला आहे ज्याचे, आपल्या शरीरावर अनेक फायदे होतात. विशेषत: हिवाळ्यात हळदीचे जास्त सेवन करण्याचा सल्ला डाँक्टर आपल्याला देतात. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते, जे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे कमी करण्यास मदत करते. याशिवाय घसा खवखवणे आणि सूज कमी करणारे गुणधर्मही हळदीत आढळतात. त्यामुळे हळदीचे जास्तीत जास्त सेवन हिवाळ्यात फायदेशीर ठरते.
काळी मिरी :
काळी मिरी तिखट आणि कडू चवीची असते. हा एक असा मसाला आहे ज्याचा वापर आपण स्वयंपाकघरात कायम करतो. हिवाळ्यात ती खूप फायदेशीर ठरते. काळ्या मिरीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, काळी मिरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
लवंग :
लवंगाचा स्वभाव उष्ण आहे, हे सर्वांना माहित आहे. हिवाळ्यात लवंगाचे सेवन करणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. हिवाळ्यात तुम्ही चहा आणि भाज्यांमध्ये लवंग टाकून वापरू शकता. याचे सेवन केल्याने आपले शरीर उबदार राहते आणि लवंगातील सर्व पोषक तत्वांचा लाभही आपल्याला मिळतो. त्याने सर्दी, पडश्यापासूनही आराम पडतो, असे म्हटले जाते.
तमालपत्र :
तमालपत्र हा एक असा मसाला आहे जो हिवाळ्यात खाल्ल्यास विशेष फायदे होतात. तमालपत्रात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व पोषक घटक हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात. तमालपत्राची उष्ण प्रकृती रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तमालपत्र खोकला, सर्दी यांसारख्या समस्यांपासून आपला बचाव करते. याशिवाय हाडांसाठी आणि दातांसाठीही फायदेशीर आहे.
दालचिनी :
दालचिनीचा उबदार प्रभाव शरीराला आतून उबदार ठेवतो, ज्यामुळे हिवाळ्याच्या थंडीपासून आराम मिळतो. हे आपली प्रतिकारशक्ती वाढवते आणि त्वचेच्या संसर्गासारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.












Click it and Unblock the Notifications