स्वाईन फ्लूचा धोका वाढला! महाराष्ट्रात किती जणांना लागण, कुठे सर्वाधिक मृत्यू, कशी घ्याल काळजी!
Swine Flu H1N1 Virus Update News : देशभरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा धोका वाढलेला आहे. एच1एन1 व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. देशातील आठ राज्यांमध्ये स्वाईन फ्लूचा प्रसार हा वेगाने होत असून तो थांबायचे नावच घेत नाही. त्यामुळे सर्वांना सावधान होण्याची व वेळीच दक्षता घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. विशेष करुन महाराष्ट्रातील स्थिती देखील चिंताजनक असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2025 मध्ये 16 राज्यांमधील 516 जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली. तर यामधील 6 जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. स्वाईन फ्लूमुळे सर्वाधिक मृत्यू केरळमध्ये झाले आहेत. या ठिकाणी चार जणांचा मृत्यू जानेवारी महिन्यात झाला आहे. त्यानंतर कर्नाटक, हिमाचल प्रदेशात एक-एक जणाचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या अहवालावरुन ही माहिती समोर आलेली आहे.

महाराष्ट्रात स्वाईन फ्लूची स्थिती काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांमध्ये स्वाईन फ्लूबाबत निगराणी वाढवण्याचे आवाहन एनसीडीसीकडून करण्यात आले आहे. तामिळनाडूमध्ये 209, कर्नाटकात 76, केरळमध्ये 48, जम्मू आणि काश्मीरमध्ये 41, दिल्लीत 40, पुद्दुचेरीमध्ये 32, महाराष्ट्रात 21 आणि गुजरातमध्ये 14 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात मृतांच्या संख्येबाबत अद्याप अद्ययावत माहिती समोर आलेली नाही. परंतु, 21 जणांना लागण झालेली आहे.
गतवर्षी मृत्यूचा तांडव
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला NCDC ने नुकताच अहवाल दिला आहे. त्या अहवालात म्हटले आहे की, 2024 मध्ये 20 हजार 414 लोकांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 347 जणांचा मृत्यू झाला. या अहवालानुसार, 2019 मध्ये सर्वाधिक 28,798 प्रकरणे नोंदवली गेली.
त्यात 1,218 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकारच्या आजारासाठी केंद्र सरकारने आधीच एक टास्क फोर्स तयार केला आहे. टास्क फोर्समध्ये आरोग्य मंत्रालय, एनसीडीसी, आयसीएमआर, दिल्ली एम्स, पीजीआई चंडीगढ, निम्स बंगळुरूसह विविध विभागातील अधिकारी आहेत. एच1एन1 हा एक इन्फ्लूएंजा व्हायरस आहे. त्याला स्वाइन फ्लू नाव दिले आहे.
स्वाईन फ्लूची लक्षणे काय?
ताप, थकवा, भूक न लागणे, खोकला, घसा खवखवणे, उलट्या आणि जुलाब ही स्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे आहेत. स्वाईन फ्लूमुळे श्वसन प्रणालीवर परिणाम होतो. कोरोनाप्रमाणेच यामध्ये एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करण्याची क्षमता देखील आहे. भारतात 2009 मध्ये पहिल्यांदा स्वाईन फ्लूचा रुग्ण मिळाला होता. 2009 ते 2018 पर्यंत स्वाईन फ्लूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण भारतात अधिक राहिले आहे. आधी हा आजार डुकरांमध्ये आढळत होता.
स्वाईन फ्लू कशामुळे होतो?
स्वाईन फ्लू, ज्याला स्वाईन इन्फ्लूएन्झा असेही म्हणतात, त्याचा परिणाम डुकरांमध्ये तीव्र श्वसन रोग झाला, जो नंतर मानवांमध्ये फ्लूचा H1N1 प्रकार, ए इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये विकसित झाला. स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवांमध्ये प्रसार होण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित शिंकतो किंवा खोकतो तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो.
तसेच जेव्हा एखादी व्यक्ती विषाणूने संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक,तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो. स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसांत संसर्गजन्य असतो. लहान मुले आणि वृद्धांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळते.
काय काळजी घेतली पाहिजे?
H1N1 विषाणूच्या उद्रेकादरम्यान, BMC आरोग्य तज्ञांनी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार, इत्यादी सह-विकृती असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. H1N1 लक्षणांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्वतःला वेगळे केले पाहिजे आणि ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काळजी घेतली पाहिजे, खाण्यापिण्यावर विशेष ध्यान ठेवण्याची गरज आहे.












Click it and Unblock the Notifications