बंगालमध्ये 25 वर्षांनंतर 70% मृत्यूदर असलेल्या व्हायरसचे संकट, देश हादरला; महाराष्ट्राला किती धोका?
Nipah virus outbreak west bengal 2026 : कोरोनाच्या भयावह आठवणी अद्यापही अंगावर शहारे आणतात, तोच, भारतासमोर एका अत्यंत घातक विषाणूचे संकट उभे राहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये तब्बल २५ वर्षांनंतर 'निपाह' (Nipah Virus) या जीवघेण्या व्हायरसने पुनरागमन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील एका खाजगी रुग्णालयातील दोन आरोग्य कर्मचारी सध्या मृत्यूशी झुंज देत असून, या बातमीने केंद्र आणि राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?
बारासात येथील एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या दोन नर्स (एक महिला आणि एक पुरुष) अचानक गंभीर आजारी पडल्या. त्यांना सध्या लाईफ सपोर्ट सिस्टीम (व्हेंटिलेटर) वर ठेवण्यात आले आहे. हे दोन्ही कर्मचारी डिसेंबरमध्ये त्यांच्या गावी (पूर्व मिदनापूर आणि पूर्व बर्धमान) गेले होते, तिथून परतल्यानंतर त्यांच्यात निपाहची तीव्र लक्षणे दिसून आली आहेत. नमुने तपासणीसाठी पुण्याच्या 'एनआयव्ही' (NIV) लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
नक्की भीती कशाची? (मृत्यूदर ७०%)
निपाह व्हायरस हा कोरोनापेक्षा कित्येक पटीने अधिक घातक मानला जातो.
डेथ रेट: कोरोनाचा मृत्यूदर २-३% होता, मात्र निपाहचा मृत्यूदर ४०% ते ७०% इतका प्रचंड आहे.
इतिहास: २००१ मध्ये सिलीगुडीत निपाहने थैमान घातले होते, तेव्हा ६६ बाधितांपैकी ४५ जणांचा मृत्यू झाला होता.
इतर राज्यांना (विशेषतः महाराष्ट्राला) धोका किती?
पश्चिम बंगालमधील हे लोण इतर राज्यात पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, याची तीन कारण आहेत.
१. आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रवास
बाधित कर्मचारी ज्या जिल्ह्यांतून प्रवास करून आले, तिथे संपर्क साखळी मोठी असू शकते.
२. मानवी संपर्क
हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या लाळेतून किंवा घामातून पसरतो. आंतरराज्य प्रवासामुळे याचा प्रसार वेगवान होऊ शकतो.
३. फलभक्षक वटवाघुळे
निपाहचा मुख्य स्त्रोत 'फ्रूट बॅट्स' (वटवाघळे) आहेत. ही वटवाघळे भारतभर आढळतात. त्यामुळे इतर राज्यांनीही हाय अलर्टवर राहणे गरजेचे आहे.
लक्षणे आणि सावधगिरी काय?
लक्षणे: तीव्र ताप, डोकेदुखी, चक्कर येणे, मानसिक गोंधळ आणि श्वास घेण्यास त्रास होणे.
काय टाळावे: जमिनीवर पडलेली किंवा पक्ष्यांनी कुतरलेली फळे खाऊ नका. कच्चा खजुराचा रस पिणे टाळा. नियमित हात स्वच्छ धुवा.
केंद्र सरकारने 'नॅशनल जॉइंट आऊटब्रेक रिस्पॉन्स टीम' बंगालला रवाना केली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांनीही सीमावर्ती भागांत आणि विमानतळांवर देखरेख वाढवणे आता काळाची गरज बनली आहे.
हेही वाचा : गंभीर इशारा! हार्ट अटॅक येण्यापूर्वी महिनाभर शरीर देतं 'हे' 5 मोठे संकेत, वेळीच ओळखा मृत्यूचा धोका












Click it and Unblock the Notifications