ITT Bombay : काही अँटीबायोटिक्स यकृतासाठी घातक का ठरतात? IIT मुंबईच्या संशोधनातून धक्कादायक खुलासा
ITT bombay study antibiotics liver damage : संसर्गजन्य आजारांवर मात करण्यासाठी आपण सर्रास अँटीबायोटिक्स घेतो. मात्र, काही अँटीबायोटिक्स यकृताला (Liver) इतर औषधांच्या तुलनेत अधिक इजा पोहोचवतात. हे नेमके कशामुळे होते? याचे उत्तर आता IIT मुंबई आणि मलेशियाच्या सनवे युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.

संशोधनाचा मुख्य निष्कर्ष: 'ड्रग' कुठे स्थिरावतो हे महत्त्वाचे
आजवर असा समज होता की औषध किती 'स्ट्राँग' आहे, यावर यकृताची हानी अवलंबून असते. मात्र, या नवीन संशोधनानुसार, औषध यकृताच्या पेशींच्या बाह्य आवरणाशी नेमके कशा प्रकारे संवाद साधते, यावर सर्व काही अवलंबून आहे. संशोधकांनी टेिकोप्लानिन आणि ओरिटाव्हान्सिन या दोन समान गुणधर्म असलेल्या अँटीबायोटिक्सचा अभ्यास केला.
ओरिटाव्हान्सिन (Oritavancin):
हे औषध पेशीच्या आवरणात खोलवर शिरते आणि तिथेच स्थिर राहते. त्यामुळे पेशीच्या नैसर्गिक कार्याला फारसा अडथळा येत नाही.
टेिकोप्लानिन (Teicoplanin)
हे औषध पेशीच्या बाह्य पृष्ठभागावर जास्त काळ चिटकून राहते. यामुळे पेशीच्या आवरणातील विद्युत प्रभार आणि हालचालीत बदल होतो, ज्यामुळे यकृताला इजा पोहोचते.
प्राण्यांवरील चाचणीत काय दिसले?
संशोधकांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, 'टेिकोप्लानिन' दिलेल्या उंदरांमध्ये लिव्हर एन्झाइम्स वाढले होते आणि यकृताला सूज आली होती. याउलट, 'ओरिटाव्हान्सिन' दिलेल्या उंदरांमध्ये यकृताची हानी अत्यंत कमी प्रमाणात आढळली.
भविष्यातील औषध निर्मितीसाठी दिशादर्शक
अनेक औषधे क्लिनिकल ट्रायलमध्ये पास होतात, पण बाजारात आल्यावर त्यांच्यामुळे यकृताला होणाऱ्या त्रासामुळे ती मागे घ्यावी लागतात. IIT मुंबईचे हे संशोधन औषध निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच औषध किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी नवीन तंत्र विकसित करण्यास मदत करेल.
(डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य शैक्षणिक उद्देशासाठी आहे. कोणतेही औषध घेण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)












Click it and Unblock the Notifications