Health Tips : तुम्हाला माहिती आहे का, उन्हाळ्यात दिवसभर किती ग्लास पाणी प्यावं, जाणून घ्या सविस्तर
How much water to drink in summer : होळीचा सण झाल्यानंतर वातावरणात बदल होतो अन् प्रचंड उन्ह तापायला लागते. कितीही थंड हवेचे ठिकाण असू द्या ठिकाणी देखील जीवाची लाही लाही व्हायला लागते. उन्हही वाढतं आणि वाराही गरम लागतो. अशा वातावरणात आरोग्याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात सगळ्यात महत्वाचं काम असतं शरीर हायड्रेट ठेवणं.
वातावरणातील गरमी वाढल्याने पाणी अधिक पिणं गरजेचं असतं. शरीरातील पाणी कमी झाले नाही पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. उन्हाळ्यात दिवसभरात तुमच्या शरीरात किती पाणी गेले पाहिजे, नेमकं पाणी कसं व किती प्यावं याविषयी आज आपण या लेखातून समजून घेणार आहोत.
किती पाणी प्यावे याविषयी अनेक समजुती
एखाद्या व्यक्तीने किती पाणी प्यावे याविषयी लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समजुती आहेत. काही म्हणतात 8 ग्लास पाणी प्यावे, तर काही 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी किती पाणी पिण्याची गरज आहे? आम्ही तुम्हाला त्यासंबंधित थोडक्यात मार्गदर्शन करणार आहोत.
लघवीच्या रंगावरून तुम्हाला समजेल पाण्याची किती गरज?
लघवीच्या रंगावरून आपण आपल्या शरीराला किती पाण्याची गरज आहे, हे ओळखू शकता. कारण तुम्ही एका दिवसात किती पाणी प्यावे याने काही फरक पडत नाही. त्याऐवजी, तुम्ही किती द्रवपदार्थ, फळे, भाज्या खाता यावर देखील शरीर हायड्रेट आहे की नाही हे कळून येते. शिवाय उन्हाळा असो किंवा हिवाळा नियमित 8 ते 10 पाणी प्या. यामुळे शरीरात कधीच पाण्याची कमतरता भासणार नाही.

पाणी शरीरासाठी किती महत्त्वाचे?
चांगला आहार आणि स्वच्छ हवेसोबतच शरीरासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. शुद्ध, स्वच्छ पाणी हे शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया योग्यपणे चालण्यासाठी गरजेचं असतं. पाण्याने केवळ आपली तहानच भागते असं नाही तर हे संपूर्ण शरीरासाठी महत्त्वाचं असतं.
आपल्याला कधी आणि किती पाणी प्यायला हवे...!
झोपेतून उठल्यावर
सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिणे चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. झोपेतून उठल्यावर एक ग्लास साधं पाणी किंवा कोमट पाणी प्यायल्याने आतड्यांना फायदा होतो. याने शरीराचे विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. तसेच रात्रभर पाण्याचं कमी झालेलं प्रमाणही याने नियंत्रित होतं.
जेवणाआधी किती?
जेवण करण्याआधी पाणी प्यायल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल. याचा अर्थ तुम्हाला जेवण कमी करण्याची शक्यता राहणार नाही. जेव्हा तुम्ही हायड्रेट असता तेव्हा पोटही जेवणासाठी तयार झालेलं असतं. पाणी चवीच्या पेशींना जागं करतो आणि पोटालाही मॉइश्चराइज करतो. एक ग्लास पाणी प्यायल्याने जेवताना तुम्हाला फार पाणी पिण्याची गरज पडणार नाही.
वर्कआउट करण्याआधी किती पाणी प्यावे
तापमान आणि तुमच्या शरीरातील द्रव्य स्तराच्या आधारावर तुम्हाला वर्कआउट दरम्यान आणि नंतर डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी एक ग्लास पाणी पिण्याची गरज असते. याने तुमचा स्ट्रोकच्या समस्येपासूनही बचाव होऊ शकतो.
वर्कआउटनंतर किती पाणी प्यायला पाहिजे
वर्कआउटनंतर तुम्हाला घाम आणि लघवीच्या माध्यमातून खर्ची केलेल्या तरल पदार्थांची गरज असते. त्यासाठी तुम्हाला पाणी पिणे गरजेचं असतं. तुम्ही कोणत्याही वातावरणात व्यायाम करा, पण पाणी आवर्जून प्यावं.
बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यावर
जर तुम्ही आजारी लोकांच्या संपर्कात असाल तर वायरस आणि बॅक्टेरिया दूर ठेवण्यासाठी तुम्हाला सामान्यापेक्षा थोडं जास्त पाणी प्यावं लागेल. याने शरीर बॅक्टेरिया मुक्त होईल. याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.
आजारी असताना किती पाणी प्यावं
जेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताप असतो, कफ किंवा सर्दीची समस्या असते तेव्हा शरीरात पाणी कमी होतं. याने तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. अनेक तज्ज्ञ सांगतात की, अशा स्थितीत जर भरपूर पाणी सेवन केलं तर आजार लवकर दूर पळतो.
थकवा येतो तेव्हा
थकवा हा डिहायड्रेशनच्या लक्षणांपैकी एक असल्याचं तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते तेव्हा थकवा जाणवतो. तुम्हाला ऑफिसमध्ये काम करताना थकवा जाणवत असेल तर एक ग्लास पाणी घ्या, तुमचा थकवा दूर होईल.
उन्हाळ्यात पाण्याची विशेष काळजी गरजेची?
उन्हाळ्यात पाणी पीत राहणं गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञ उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. काही प्रमाणात पाणी यकृत, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू, स्नायू आणि हाडे तसेच शरीराच्या इतर अनेक अवयवांमध्ये देखील साठवले जाते, हे त्यांचे कार्य चालवून ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात सातत्याने पाणी पित राहणे हे आरोग्यासाठी देखील अतिशय फायद्याचे असते.
पाणी पिण्याचे फायदे
- पाणी पिल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
- पाणी पिल्याने वजन कमी होते.
- पाणी शरीराला हायड्रेट ठेवते
- पाणी शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करते
- शरीराला पुरेसे पाणी मिळाल्यास त्वचा ओलसर राहते.
- पाणी प्यायल्याने हाडे मजबूत राहतात
(टीप- सदर माहिती ही इंटरनेट स्त्रोतावरुन घेतलेली आहे, प्रत्यक्षात तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा)












Click it and Unblock the Notifications