सावधान! स्तनाच्या कर्करोगाचे संकेत देणारे त्वचेतील 'हे' 5 बदल; वेळीच ओळखा लक्षणे अन् वाचवा जीव!
Breast Cancer News : जगभरातील महिलांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण म्हणून स्तनाचा कर्करोग समोर येत आहे. 'कॅन्सर इंडिया ऑर्गनायझेशन' संस्थेच्या धक्कादायक आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी दोनपैकी एका महिलेचा मृत्यू या आजाराने होतो.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये जगभरात अंदाजे 6.70 लाख मृत्यू या कर्करोगामुळे झाले आहेत. त्यात कर्करोगाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आले.
तज्ज्ञांच्या मते, या आजाराचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे लक्षणे उशिरा लक्षात येणे. जर सुरुवातीच्या टप्प्यातच त्वचेतील बदल ओळखले, तर उपचार सुलभ होऊन मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. आज आम्ही अशाच सुरुवातीचे त्वचेतील या 5 बदलांविषयी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

१. त्वचेला खड्डे पडणे किंवा त्वचा आत ओढली जाणे
जर तुमच्या स्तनाची त्वचा अचानक बुडलेली, खड्डे पडलेली किंवा आतल्या बाजूला ओढलेली दिसत असेल, तर हे चिंतेचे कारण असू शकते. जेव्हा त्वचेखालील ऊती आत खेचल्या जातात, तेव्हा असे बदल दिसतात. अनेकदा यामध्ये कोणतीही गाठ जाणवत नाही किंवा वेदना होत नाहीत, त्यामुळे महिला याकडे दुर्लक्ष करतात; परंतु हे लक्षण कर्करोगाचे असू शकते.
२. त्वचेचा लालसरपणा किंवा सतत उबदार वाटणे
स्तनाच्या त्वचेवर लालसरपणा येणे किंवा तो भाग गरम लागणे, याला अनेकदा सामान्य पुरळ, ऍलर्जी किंवा संसर्ग मानले जाते. मात्र, जर हा लालसरपणा घरगुती किंवा सामान्य उपचारांनी बरा होत नसेल आणि हळूहळू पसरत असेल, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे.
३. 'संत्र्याच्या साली' सारखी त्वचा होणे!
जर स्तन अचानक जड, घट्ट किंवा आकाराने मोठे वाटू लागले असतील आणि त्यावरील त्वचा जाड होऊन तिला संत्र्याच्या सालीसारख्या सुरकुत्या पडल्या असतील, तर हे गंभीर लक्षण आहे. कोणत्याही दुखापतीशिवाय किंवा संसर्गाशिवाय आलेली अशी सूज कर्करोगाच्या पेशींच्या वाढीचा संकेत असू शकते.
४. स्तनाग्रातून रक्तस्त्राव होणे
तज्ज्ञांच्या मते, औषधांशिवाय किंवा कोणतीही इजा नसताना स्तनाग्रातून आपोआप रक्तस्त्राव होणे हे धोक्याचे लक्षण आहे. विशेषतः जर ही समस्या एकाच स्तनातून होत असेल आणि स्तनाग्र दाबलेले नसतानाही स्त्राव होत असेल, तर विलंब न करता वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
५. सततचा कोरडेपणा आणि त्वचा सोलणे
स्तनाग्र किंवा त्याभोवतीच्या त्वचेवर सतत कोरडेपणा येणे, त्वचा सोलणे किंवा तिथे फोड येणे याला अनेकदा 'एक्झिमा' सारखी सामान्य समस्या समजले जाते. परंतु, हा कोरडेपणा काही प्रकरणांमध्ये स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकतो. त्यामुळे त्वचेचे साधे वाटणारे विकारही गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
घाबरू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या!
वरीलपैकी कोणतेही लक्षण आढळल्यास घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्या. दर महिन्याला स्वतःची शारीरिक तपासणी करणे आणि ठराविक वयानंतर मॅमोग्राफी करणे हाच बचावाचा सर्वोत्तम उपाय आहे.












Click it and Unblock the Notifications